|| किशोर कोकणे

उद्योग, कंपन्यांतील अकाऊंटंटही  सुट्टीवर असल्याने पंचाईत

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी जाहीर केल्यानंतर ठाणे जिल्ह्य़ातील उद्योग क्षेत्रालाही टाळे लागले आहे. मात्र, कामगारांचा संपूर्ण तपशील कंपन्यांतील संगणकांमध्ये साठवलेला असून या तपशीलाच्या आधारेच कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यात येते. संचारबंदीमुळे वेतन काढण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही घराबाहेर पडून कार्यालयात जाणे शक्य होत नसून या पार्श्वभूमीवर ठाण्यातील लघु आणि मध्यम उद्योजकांनी समाजमाध्यमांद्वारे अशा कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी मुभा देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, चालू महिन्याच्या पगाराचे काय होणार, अशी चिंता कर्मचाऱ्यांना सतावू लागली आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील वागळे इस्टेट, भिवंडी यासह विविध भागात औद्योगिक वसाहती असून त्याठिकाणी तीन हजारांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योगाचे कारखाने आहेत. याठिकाणी ठाणे तसेच आसपासच्या शहरातील लाखो कामगार काम करतात. त्यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात संचारबंदी लागू करण्यात आली असून यामुळे उद्योग क्षेत्राचेही कामकाज ठप्प झाले आहे. या कारखान्यांमध्ये यंत्राद्वारे विविध वस्तुंचे उत्पादन घेतले जात असून करोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी हे कारखाने बंद करण्यात आले आहे. मात्र, आयटी कंपन्यांप्रमाणे कारखान्यातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करणे शक्य नसल्यामुळे या कारखान्यांचे काम बंद पडले आहे. असे असतानाच येथील कर्मचाऱ्यांवर आता वेतन संकट ओढावले आहे.

रोजंदारांना कामा आधी उचल द्यावी लागते. तर, कर्मचाऱ्यांना मासिक वेतन दिले जाते. मात्र, या दोघांपुढे आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता आहे. कामगारांचा संपूर्ण तपशील कंपन्यांतील संगणकांमध्ये साठवलेला असून या तपशीलाच्या आधारेच कर्मचाऱ्यांचे    वेतन काढण्यात येते. संचारबंदीमुळे कारखाने बंद असल्याने वेतन काढण्याचे काम करणारे कर्मचारी घरी आहेत. कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी त्यांना कारखान्यात जावे लागणार आहे. परंतु पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना कारखान्यात जाणे शक्य होत नाही. त्यातच महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे वेतन मिळणार कि नाही आणि पुढील महिन्याचा घरखर्च भागवायचा कसा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर वेतन काढण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना  कारखान्यामध्ये जाऊ द्या अशी मागणी उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याचे काम दोन ते तीन कर्मचारी करत असतात. त्यांना कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी केवळ कारखान्यात जाऊ देण्याची मुभा द्यावी. तसेच गर्दी होणार नाही याची दक्षता उद्योजक नक्कीच घेतील. त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे लक्ष घालावे.

– एकनाथ सोनावणे, कार्यकारी सचिव, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन