पुणे : पुण्यात वाहतुकीचा बोजवारा उडण्यास प्रामुख्याने वाहनचालकांची बेशिस्त कारणीभूत ठरल्याची ओरड सुरू असते. अशा बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अत्याधुनिक साधनांचा वापर सुरू केला. यानुसार चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कारवाईही सुरू झाली. मात्र, लाखो वाहनचालकांवर कारवाई होत असली तरी त्यांच्यावरील दंडाची वसुली मात्र थंड आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चौकाचौकात बसवलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून कारवाई केली जाते. यात सिग्नल मोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, हेल्मेट परिधान न करणे अशा स्वरुपाची कारवाई केली जाते. चालू वर्षात १ जानेवारी ४ मार्च या कालावधीत पुणे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे १ लाख ८ हजार ९२५ वाहनचालकांवर कारवाई केली. प्रत्यक्षात त्यातील ५ हजार ७३३ जणांकडून दंड वसूल करण्यात पोलिसांना यश आले आहे. म्हणजेच एकूण कारवाईच्या तुलनेत दंडाचे प्रमाण ५ टक्क्यांहूनही कमी आहे. शहरात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांकडूनही कारवाई केली जाते. यासाठी त्यांना अत्याधुनिक यंत्रे देण्यात आली आहेत. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाचे छायाचित्र वाहतूक पोलीस या यंत्राच्या सहाय्याने काढतात. त्यानंतर लगेचच संबंधित वाहनचालकाला दंडाची पावती दिली जाते. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते ४ मार्च या कालावधीत ३४ हजार वाहनचालकांवर कारवाई केली. त्यातील ९ हजार ५०० जणांकडून दंड वसुली करण्यात यश आले. हे प्रमाण एकूण कारवाईच्या २५ टक्क्यांहून अधिक आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या आधारे होणाऱ्या दंड वसुलीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेचे एकूण २७ विभाग असून, १ हजार ६६ कर्मचारी कार्यरत आहेत.

हेही वाचा – पुणे शहर आणि परिसरात संध्याकाळनंतर दोन टप्प्यांत पावसाची शक्यता

चौकातील पोलिसांवर आहे लक्ष

वाहतूक पोलीस चौकात उभे न राहता घोळक्याने दुसरीकडे थांबतात, अशी तक्रार नेहमी केली जाते. यावर उपाय म्हणून नवीन ॲप्लिकेशनचा वापर सुरू आहे. या ॲप्लिकेशनमुळे वाहतूक पोलीस कर्मचारी नेमका कुठे आहे, याची प्रत्यक्ष माहिती वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षाला मिळते. आधी पोलीस चौकापासून ५० मीटर अंतरावर असेल तर तो चौकात उभा आहे, असे दिसायचे. आता हे अंतर केवळ १० मीटर करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण मेट्रोचे सुरू असलेले काम हे आहे. मेट्रोची कामे सहा-सहा महिने सुरू आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. याचबरोबर कामाच्या वेळाही पाळल्या जात नाहीत. वर्दळीच्या वेळी काम केल्यास कोंडीत भर पडते. त्यातही कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर म्हणाले.

हेही वाचा – यूएलसी कायद्यांतर्गत सवलत दिलेल्या ७० कंपन्यांनी हस्तांतरण शुल्क बुडविल्याचे उघड

वाहनचालकांवर कारवाई (१ जानेवारी ते ४ मार्च)

  • एकूण कारवाई – १ लाख १२ हजार ३२५
  • दंड भरणारे वाहनचालक – १५ हजार २२२
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lacks of motorists fined in pune by traffic police but not enough recovery pune print news stj 05 ssb