पुणे : लाडकी बहीण योजना लागू करताना अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ द्यायचा होता. तेव्हा नियम तपासण्यासाठी वेळ मिळाला नाही. आता तपासणी करून अपात्र महिलांचा लाभ बंद केला जाईल. मात्र, यापूर्वी लाभ घेतलेल्या महिलांचे पैसे परत घेण्यात येणार नाहीत, असे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर बोलताना पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजना जूनमध्ये जाहीर केली. या योजनेचे पैसे ऑगस्टनंतर देण्यास सुरुवात करून नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्यांचे पैसे दिले. चारचाकी, वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना योजनेचा लाभ बंद करणार आहोत. लाभार्थींनी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, अशी सरकारची भूमिका आहे. राज्यात श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना नियम डावलून खरेदी केल्याचे पुरावे दिले आहेत, याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले की, अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी आरोप केले आहेत. दमानिया यांच्या आरोपात तथ्य नाही. आरोपात तथ्य असेल तर चौकशी होईल. दमानियांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. याबद्दल मला असलेली माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हीच याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती मी केली आहे.
राज ठाकरेंना टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला कमी जागा मिळायला हव्यात, असे विधान केले होते. यावर पवार म्हणाले की, तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आले नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता. विधानसभेला आम्ही कष्ट केल्यामुळे आमचे जास्त आमदार निवडून आले. मला लोकसभेच्या एका निवडणुकीत मुलाला आणि दुसऱ्या निवडणुकीत पत्नीला निवडून आणता आले नाही. आता जनतेने आम्हाला कौल दिला आहे.