पुणे : अयोध्येत साकारलेल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती, अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, राज्य सरकारची लाडकी बहीण योजना, राजकारणावर भाष्य करणारा कोणता झेंडा घेऊ हाती, प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासंदर्भात जनजागृती अशा वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी करणारे देखावे यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांचे लक्ष वेधणार आहेत. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवरील देखावे उत्सव मंडपात साकारण्याची कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे.

प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित ते छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या देखाव्यांना मागणी आहे. तर, गणेशोत्सवासाठी स्थिर देखाव्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीत वैविध्यपूर्ण विषयांवरील स्थिर देखावे पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा >>> बिबवेवाडीतून तीन शाळकरी मुली बेपत्ता; पोलिसांच्या तत्परतेमुळे शोध मुली कल्याणमध्ये सुखरुप सापडल्या

विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी साकारलेल्या वैविध्यपूर्ण विषयांवरील हलते देखावे पाहण्यासाठी उत्सवात मोठी गर्दी होते. हलते देखावे साकारणाऱ्या कलाकारांनी मंडळांच्या मागणीप्रमाणे आणि संकल्पनेप्रमाणे हलत्या देखाव्यांचा सेट तयार केला आहे. यंदा हलत्या देखाव्यांमध्ये सामाजिक विषयांवरील देखाव्यांना सर्वाधिक प्रतिसाद असून, उत्सवात सामाजिक जनजागृती व्हावी, यासाठी मोबाइलच्या दुष्परिणामांपासून ते वृक्ष संवर्धनावर आधारित हलत्या देखाव्यांचे सेट तयार करण्यात आले आहेत. भारतीय जवान, जातिभेद निर्मूलन, गडकिल्ले संवर्धन अशा सामाजिक विषयांवरही हलते देखावे पुणेकरांचे लक्ष वेधून घेणार आहेत. स्थिर देखाव्यांचीही तयारी कलाकारांनी सुरू केली असून त्यातही ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> NCP Ajit Pawar Proup : “एकाच महिलेला किती पदे देणार?”, अजित पवार गटात वादाची ठिणगी? रुपाली पाटील-ठोंबरे विरुद्ध चाकणकर वाद चव्हाट्यावर

गेल्या अनेक वर्षांपासून हलते देखावे तयार करणारे सतीश तारू म्हणाले, हलत्या देखाव्यांना यंदा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक प्रबोधनपर हलते देखावे यंदा तयार केले आहेत. एका देखाव्याच्या सेटमध्ये चार ते दहा फायबरच्या पुतळ्यांचा समावेश केला आहे. प्रत्येक पुतळ्याला देखाव्यांच्या विषयांप्रमाणे साजेशी वेशभूषा, आभूषणेही तयार केली आहेत. देखाव्यांमधील सगळे पुतळे फायबरचे असून, आम्ही गेल्या काही महिन्यांपासून देखावे तयार करण्यासाठी काम करीत आहोत. यंदा आम्ही २५ देखाव्यांचे सेट तयार केले आहेत. देखाव्यांच्या सेटची किंमत २० हजार रुपयांच्या पुढे आहे. आजही हलत्या देखाव्यांना चांगला प्रतिसाद आहे.

गणेशोत्सवातील प्रतिष्ठापनेचा दिवस आणि गणेश विर्सजन मिरवणुकीसाठीच्या रथावर यंदा स्थिर देखाव्यांसाठी मागणी होत आहे. त्यानुसार आम्ही स्थिर देखावे तयार केले आहेत. गणेश महल, गजलक्ष्मी रथ, शिव रथ अशा संकल्पनांवर आधारित स्थिर देखावे तयार करत आहोत. – संदीप गायकवाड, स्थिर देखावे तयार करणारे कलाकार