दिवाळीत पुण्यात काही गोष्टींची आठवण आवर्जून निघतेच. पुण्यात लागणारे फटाक्यांचे स्टॉल, महापालिकेची किल्ला स्पर्धा, दिवाळीनिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम.. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. दिवाळीत आणखी एका गोष्टीची चर्चा आवर्जून होते ती म्हणजे म्हणजे लाडू, चिवडा विक्रीच्या उपक्रमाची. दी पूना र्मचट्स चेंबरतर्फे चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचं यंदा एकोणतिसावं वर्ष आहे. या उपक्रमासाठी लागणारा लाडू, चिवडा तयार करण्याचा कारखाना शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू समाज कार्यालयात सुरू असतो. हा कारखाना गेल्या आठ दिवसांपासून तेथे सुरू आहे.

सध्या लाडू आणि चिवडा तयार करण्यासाठी शंभर आचारी गेले आठ दिवस तेथे अहोरात्र म्हणजे तिन्ही पाळ्यांमध्ये काम करत आहेत. शिवाय बुंदीचे लाडू वळण्याचं काम साडेपाचशे महिला करत आहेत. लाडूंचं वजन करून खोके भरणं, चिवडय़ांची पाकिटं भरणं आणि इतर कामांसाठी शंभर ते दीडशे कामगार आहेत. असा हा कारखाना दहा-बारा दिवस चालतो. त्यामुळेच तेथे जाऊन हा कारखाना पाहणं हा वेगळाच अनुभव असतो.

यंदा सुमारे दीड लाख किलो लाडू आणि दीड लाख किलो चिवडा या उपक्रमात विकला जाईल. लाडूचा दर यंदा एकशेवीस रुपये, तर चिवडय़ाचा दर एकशेपाच रुपये प्रतिकिलो असा आहे. या उपक्रमाला एवढं मोठं यश मिळण्याची कारणं चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी सांगितली. मुख्य म्हणजे लाडू, चिवडय़ासाठी जो कच्चा माल वापरला जातो, तो अतिशय उच्च प्रतीचा असतो. बेसनपीठ आणण्याऐवजी डाळ खरेदी करून ती दळून घेतली जाते. मुख्य म्हणजे चेंबरचे पदाधिकारी या उपक्रमासाठी भरपूर वेळ देतात. सर्वाचं प्रत्येक प्रक्रियेत बारकाईनं लक्ष असतं. उपक्रमाची तयारी महिनाभर आधीच सुरू झालेली असते. गेल्या काही वर्षांत हा उपक्रम खूप नावारूपाला आला आहे आणि विक्रीतही खूप मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे.

हा उपक्रम सुरू झाला त्या वर्षी साखरेचे भाव खूप वाढलेले होते. त्यातून सर्वसामान्यांसाठी रास्त दरात लाडू देण्याचं पूना र्मचट्स चेंबरनं ठरवलं आणि पहिल्या वर्षी पाच रुपये किलो लाडू आणि पाच रुपये किलो चिवडा असा दर ठेवण्यात आला. पहिल्या वर्षी पाच हजार किलो लाडू, चिवडा विकण्यात आला होता. पुढे दरवर्षी हा आकडा वाढत गेला.

लाडू, चिवडा तयार करण्याचं हे काम चेंबरनी पप्पूराम गौड यांना दिलं आहे. ते मूळचे जोधपूरचे आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी केटरिंग व्यवसायाच्या निमित्तानं ते पुण्यात आले आणि पुणेकर होऊन गेले. यंदा किती साहित्य लाडू, चिवडय़ासाठी वापरलं जाईल हे त्यांनी सांगितलं. हे आकडे खूपच बोलके होते. एक हजार पोती साखर, अडीच हजार डबे तूप, तीन हजार डबे तेल, पाचशे पोती चणाडाळ, तीस हजार किलो दगडी पोहे, दहा हजार किलो खोबरं, दोन हजार किलो दाणे आणि एक ट्रक कढिपत्ता असा ढोबळ मानाचा हिशेब पप्पूराम यांनी बोलता बोलता सांगितला. या शिवाय बेदाणे, हळद, तिखट, मसाले वगैरे इतर साहित्य वेगळंच.

ना नफा ना तोटा दरातील लाडू, चिवडय़ाचा हा अनोखा उपक्रम ओसवाल बंधू समाज कार्यालयात जाऊन आज आणि उद्या पाहता येईल. तिथे गेलात तर चेंबरचे अध्यक्ष चोरबेले, स्वत: पप्पूराम आणि इतर उत्साही मंडळी तुम्हाला हा कारखाना फिरून दाखवतील आणि ते पाहून एक आगळावेगळा कारखाना बघितल्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल.

Story img Loader