महिला महोत्सवात झालेल्या बेसुमार खर्चाबाबत आणि त्यातील मानापमान नाटय़ाबाबत हरकती घेणाऱ्या मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेविकांबद्दल स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी अपमानकारक उद्गार काढल्यामुळे, तसेच महोत्सवाचा हिशेब महापौरांनी न दिल्यामुळे या प्रकाराच्या निषेधार्थ विरोधी नगरसेविकांनी बुधवारी महापालिका सभेतून सभात्याग केला.
महापालिका सभा सुरू होताच विरोधी नगरसेविकांनी महिला महोत्सवाबाबत अनेक गंभीर आक्षेप नोंदवायला सुरुवात केली. मुळातच, अकरा लाखांच्या खर्चाला मान्यता असताना या महोत्सवावर तब्बल पंचवीस लाखांचा खर्च करण्यात आला, तसेच सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मानापमानामुळे एकाच महोत्सवाच्या दोन-दोन निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या, या आणि अशा अनेक हरकती घेत विरोधी नगरसेविकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
सत्ताधारी विरुद्ध विरोधी नगरसेविका असा हा वाद तासभर सुरू होता. आधी खर्चाचा हिशेब द्या, अशी मागणी विरोधी नगरसेविका करत होत्या. मात्र, प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाही. त्यानंतर भाजपच्या प्रा. मेधा कुलकर्णी, मुक्ता टिळक, मंजुषा नागपुरे, वर्षां तापकीर, मानसी देशपांडे, माधुरी सहस्रबुद्धे, मनसेच्या रूपाली पाटील, पुष्पा कनोजिया, सुशीला नेटके, प्रिया गदादे, नीलम कुलकर्णी, वनीता वागसकर, शिवसनेच्या दीपाली ओसवाल, सोनम झेंडे, संगीता ठोसर यांनी महापौरांच्या आसनासमोर येत महोत्सवाच्या हिशेबाची मागणी केली.
हा वाद सुरू असताना स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी मधेच हस्तक्षेप केला. तुम्ही आता गप्प बसा. तुमच्या बातम्यांची आणि नावे येण्याची व्यवस्था झाली आहे. तेव्हा आता वाद आणि चर्चा बास झाली, असे चांदेरे विरोधी नगरसेविकांना उद्देशून म्हणाले. त्यांच्या या अपमानकारक उद्गारांनी विरोधी नगरसेविका चांगल्याच संतप्त झाल्या. त्यांनी चांदेरे यांचा जोरदार निषेध केला. आम्ही ज्या हरकती घेतल्या आहेत त्यांना उत्तरे देण्याऐवजी चांदेरे हा विषय भलतीकडे नेत आहेत. त्यांना या विषयात कोणी बोलायला सांगितले आहे का, अशी विचारणा यावेळी नगरसेविका करत होत्या. चांदेरे यांनी नगरसेविकांची माफी मागावी अशीही मागणी यावेळी लावून धरण्यात आली. अखेर चांदेरे यांनी सभेत माफी मागितली. त्यानंतर वारंवार मागणी करूनही खर्चाचा हिशेब महापौरांनी दिला नाही, तसेच चांदेरे यांचे वादग्रस्त उद्गार यांचा निषेध करत विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेविकांनी सभात्याग केला.

Story img Loader