नव्या सरकारने शिक्षण क्षेत्रात नव्यानेच काही समस्या निर्माण केल्या आहेत. काही लाख शिक्षक अतिरिक्त ठरतातच कसे, असा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्हाला खटकला होता, अशी टिप्पणीही त्यांनी केली. िपपरी शिक्षण मंडळाच्या सततच्या पेपरबाजीवरून पदाधिकाऱ्यांना खडसावतानाच, पावसाळा संपत आला तरी विद्यार्थ्यांना रेनकोट का नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
भोसरीतील लांडगे नाटय़गृहात शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक व शाळांचा सत्कार अजितदादांच्या हस्ते झाला. महापौर शकुंतला धराडे, आमदार महेश लांडगे, शिक्षण मंडळाचे सभापती धनंजय भालेकर, उपसभापती श्याम आगरवाल, आयुक्त राजीव जाधव, अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे, माजी महापौर संजोग वाघेरे, आझम पानसरे, योगेश बहल, मोहिनी लांडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, पूर्वीच्या काळी तिमाही, सहामाही, वार्षिक परीक्षा होत होत्या. विद्यार्थी एखाद्या विषयात कमी पडत असल्यास त्याला तयार करण्याचे काम शिक्षक करत होते. परंतु, आता चित्र बदलले. नवे सरकार, नवे मंत्री आले, त्यांना निर्णयाचे अधिकार आहेत. मात्र, या अधिकारांचा वापर करत असताना काही नवीन समस्या व प्रश्न निर्माण झाले आहेत. काही लाख शिक्षक अतिरिक्त ठरले असून त्यांच्या समायोजनाचा मुद्दा पुढे आला आहे. शिक्षक असे कसे अतिरिक्त ठरले. वाडय़ा-वस्त्या, डोंगरी तसेच आदिवासी भागात १५ विद्यार्थी असले तरी त्याला शिकवण्यात येत होते. आता त्यातही बदल करण्यात आला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मंडळाच्या खरेदीवरून पेपरबाजी होते. विद्यार्थ्यांना वेळीच सुविधा मिळत नाहीत. पावसाळा संपत आला तरी विद्यार्थ्यांना रेनकोट नाहीत, असे होता कामा नये. चुकीचे काम करणाऱ्या पुरवठादारांना काळ्या यादीत टाकले पाहिले. ज्यांना पदे दिलीत, त्यांनी चांगले काम करावे. चांगल्या शिक्षणसंस्था शहरात आणाव्यात. प्रास्ताविक सभापती धनंजय भालेकर यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले.

Story img Loader