फुरसुंगी येथील देशमुख मळा येथे नवीन मुठा कालव्यात राडारोडा टाकल्याने कालव्यातील पाणी पुढे सरकण्यास जागा न मिळाल्याने कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली. परिणामी लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. दिवसभर धावाधाव केल्यानंतर सायंकाळी कालव्यातून गळती होत असलेले पाणी थांबविण्यात जलसंपदा विभागाला यश आले.
हेही वाचा >>>बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या रॅपिडोच्या संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून दौंड, इंदापूर या भागातील शेतकऱ्यांना नुकतेच रब्बी हंगामासाठी सिंचन आर्वतन देण्यात आले. सध्या या कालव्यातून एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, फुरसुंगी-देशमुख मळा येथे कालव्यात मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्यात आला आहे. तसेच झाडांच्या मुळ्या वाढल्या आहेत. परिणामी कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याला वाट मिळाली नाही. त्यामुळे या भागात कालव्याला मोठ्या प्रमाणावर गळती लागली. हा प्रकार समजल्यानंतर स्थानिक नागरिकांनी जलसंपदा विभागाचे संबंधित उपअभियंता यांना मोबाइल वरून माहिती दिली. मात्र, ते उपलब्ध नसल्याने खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना माहिती देण्यात आली. पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाणी गळतीची पाहणी केली. ही पाणी गळती रोखण्यासाठी दिवसभर केलेल्या प्रयत्नांनंतर सायंकाळी गळती रोखण्यात यश मिळाले.
‘कालव्यातील गळतीची माहिती मिळताच गळती होत असलेल्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून भराव करण्यात आला. त्यामुळे गळती रोखण्यात यश मिळाले. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल,’ असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>>राज्य सरकारची सायबर विद्यापीठाची घोषणा हवेतच?
कालव्याच्या जागेत अतिक्रमण, राडारोडा
विधिमंडळ अधिवेशन असताना आणि कालव्यातून सिंचन आवर्तन सुरू असताना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडणे अपेक्षित नाही. तसेच कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा साठला असूनही पाहणी न करताच पाणी सोडण्यात आल्याची स्थानिक ग्रामस्थांची तक्रार आहे. तसेच सन २०१८ मध्ये दांडेकर पूल येथे नवीन मुठा उजवा कालवा फुटला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले होते. या कालव्यावर झालेले अतिक्रमण, कालव्यात टाकण्यात येणारा कचरा, राडारोडा यामुळे सातत्याने कालव्याची गळती होणे, फुटणे अशा घटना घडत आहेत.