पुणे : मराठा समाजातील मुलांना ९५ टक्के पडूनही नोकरी लागत नाही. आमची मुले हुशार असतानाही, आरक्षणात बसत असूनही आरक्षण नसल्याने लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार राहिले. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली, असे धक्कादायक विधान मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी केले.
हेही वाचा >>> मराठा आरक्षणाला बागेश्वर बाबा यांचा पाठिंबा; तुकोबांविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी
पुण्यातील खराडी येथे आयोजित सभेत जरांगे बोलत होते. ते म्हणाले, की मला मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत २९ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आरक्षणात मराठा समाज बसत होता, तर गेली ७० वर्षे कोणी नुकसान केले याचे उत्तर मिळाले पाहिजे. ९५ टक्के पडूनही नोकरी लागत नाही. आरक्षणाच्या निकषात बसत असतानाही लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार राहिले. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते.
मराठा ओबीसीत असलेले पुरावे समितीला मिळत आहेत. राज्यातील मराठय़ांना सरसकट आरक्षण मिळणार, यात आता शंका नाही. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे हजारो पुरावे आहेत. ज्यांना कुणबी नको, त्यांनी प्रमाणपत्र घेऊ नये.
‘भुजबळांना आता व्यक्तिगत विरोध’
भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणून त्यांना आमचा विरोध होता. चार दिवसांत केलेल्या वक्तव्यांवरून भुजबळांना व्यक्ती म्हणूनही विरोध आहे. कारण त्यांनी सर्व सीमा पार केल्या आहेत. घटनेच्या पदावर असून, त्या पदाची प्रतिष्ठा सांभाळता आली नाही. भुजबळ ३०-३५ वर्षे सत्तेत असूनही त्यांना मराठय़ांबद्दल आकसाची भावना का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.