लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : लक्ष्मीपूजन पारंपारिक उत्साहात साजरे करण्यात आले. लक्ष्मीपूजनानंतर व्यापारी पेठेत आतषबाजी करण्यात आली. मुहूर्तावर कीर्द, खतावण्यांचे पूजन करून नवीन आर्थिक वर्षातील व्यवहारांना प्रारंभ करण्यात आली.

यंदा अमावस्येचा प्रारंभ गुरुवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत पूजनाचे मुहूर्त असल्याने काहींनी गुरुवारी दुपारनंतर लक्ष्मीपूजन साजरे केले. शुक्रवारी सकाळनंतर व्यापारी बांधवांकडून लक्ष्मीपूजन करण्यात आले. पूजनानंतर व्यापारी बांधवांकडून आतषबाजी करण्यात आली. लक्ष्मी रस्ता, रविवार पेठेतील कापडगंड, सोन्या मारुती चौकातील सराफ बाजार, मार्केट यार्डातील भूसार, तसेच फळभाजी बाजारात लक्ष्मीपूजनाचा उत्साह जाणवत होता. व्यापारी पेढ्यांसमोर रंगावलीच्या आकर्षक पायघड्या घालण्यात आल्या होत्या, तसेच विद्युत रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला होता. मंडई परिसरात पूजासाहित्य, तसेच फुले खरेदीसाठी शुक्रवारी सकाळी गर्दी झाली होती. या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

आणखी वाचा-फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!

पाडव्याच्या मुहूर्तावर वजनमापांचे पूजन

पाडव्याच्या मुहूर्तावर व्यापारी वजनमापे आणि वजनकाट्यांचे पूजन करतात. पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहारत होतात. विक्रीस पाठवून देणयात आलेला माल आणि होणारी आवक याबाबतची नोंद नव्या वहीत केली जाते, अशी माहिती दी पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.

दुपारनंतर झेंडूच्या दरात घट

लक्ष्मीपूजनानिमित्त सोलापूर, धाराशिव, सातारा, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडू विक्रीस पाठविला होता. झेंडुचे दर गेले दोन दिवस तेजीत होते. प्रतवारीनुसार एक किलो झेंडूचे दर ७० ते १०० रुपये दरम्यान होते. झेंडूसह गुलाब, कापरी, शेवंती, अष्टर, गुलछडी या फुलांना ग्राहकांकडून मागणी होती. शुक्रवारी दुपारनंतर मागणी कमी झाल्याने झेंडुच्या दरात घट झाली. फुले खरेदीसाठी मंडई, शनिपार, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात गर्दी झाली होती. परतीच्या पावसाने फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाल्याने यंदा दिवाळीत चांगल्या प्रतीच्या फुलांना दर मिळाले, अशी माहिती फूल व्यापाऱ्यांनी दिली.