पुणे : एरवी ज्या रस्त्याला मोकळा श्वास घ्यायचीही फुरसत नाही, अखंड लगबग हाच ज्याचा शिरस्ता आहे, जो वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला असतो, अशा रस्त्याला पुढच्या बुधवारी पायरव ऐकता येणार आहे! पुण्याच्या मध्य वस्तीतील लक्ष्मी रस्ता ११ डिसेंबरला केवळ पादचाऱ्यांसाठी खुला राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्याच्या पूर्वेला उगवून मध्य भागातील व्यवसायसमृद्ध टापूत ‘लक्ष्मी’च्या पावलांनी शिरणारा हा रस्ता पुण्यातील व्यापारी उलाढालीचा शतकभराचा साक्षीदार आहे. नेहमी गजबजलेल्या या रस्त्यावर ११ डिसेंबरला पादचारी दिनानिमित्त पादचाऱ्यांना विनाअडथळा मार्गक्रमण करता येईल.

हेही वाचा…नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास आता दंड आणि ‘टोईंग’चा भुर्दंड

सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे, वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना महापालिकेच्या उपक्रमात सहभागी करून घेणे, पादचाऱ्यांना भेडसाविणाऱ्या समस्यांची जाणीव करून घेण्याबरोबरच महापालिका पादचाऱ्यांसाठी राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘पादचारी दिन’ उपयुक्त ठरणार आहे, असा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून केला जात आहे.

रस्त्यावरील सर्वांत महत्त्वाचा घटक असला, तरी पादचारी दुर्लक्षित आहे. पादचाऱ्यांचे अपघात होण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे अकरा डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय पादचारी दिन लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शहरात राबविण्यास सुरुवात झाली. लक्ष्मी रस्ता हा महत्त्वाचा आणि गर्दीचा असल्याने या उपक्रमासाठी या रस्त्याची जाणीवपूर्वक निवड करण्यात आली आहे. त्यामुळे येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच शहराच्या विविध भागांतही विविध उपक्रम राबविले जातात. या वेळीही तसे नियोजन पथ विभागाकडून करण्यात आले आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरूड गणपती चौक हा भाग वाहनविरहीत करून तो आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार आहे. सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत नगरकर तालीम ते गरूड गणपती चौकातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस, लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटना, पथारी संघटना, वाहतूक क्षेत्रातील विविध संस्था, संघटनांचा या उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

या उपक्रमात अधिकाधिक शहरवासीयांना सहभागी होता यावे, यासाठी कसबा, महापालिका आणि मंडई मेट्रो स्थानकापासून सायकल उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच, पीएमपीकडून जादा गाड्यांची सुविधा दिली जाणार आहे. रस्तासुरक्षा कार्यशाळा, दिव्यांग, दृष्टिहीनांसाठी विशेष कार्यक्रम, चित्र प्रदर्शन, सार्वजनिक वाहतुकीसंदर्भात प्रदर्शन, रांगोळी, विविध कला आणि संगीत कार्यक्रम, हवेच्या गुणवत्तेची चाचणी तसेच स्वच्छ संस्थेचे प्रदर्शन अशा उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा…एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला फिर्यादीने ओळखले, न्यायालयीन सुनावणीत फिर्यादीची साक्ष

या उपक्रमांच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे, पादचाऱ्यांना भेडसाविणाऱ्या अडचणी समजून घेणे, खासगी वाहना ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्यासाठी जनजागृती करणे, महापालिका राबवित असलेल्या उपयायोजनांची माहिती पादचारी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविणे, या ‘पादचारी दिना’मागील उद्देश असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. गेल्या वर्षी या उपक्रमात दहा ते बारा हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. या वर्षी त्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.

या उपक्रमांचे आयोजन…

लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षा कार्यशाळा अंध अपंग नागरिकांसंदर्भात संवेदनशीलता आणि सार्वत्रिक प्रवेश योग्यता कार्यशाळा महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा विषयावरील चित्रकला प्रदर्शन सार्वजनिक वाहतूक आणि जुन्या पुण्याच्या विकासाबाबतचे पॅनल प्रदर्शन पादचारी दिनाबाबत भव्य रांगोळी संगीत आणि वादनाचे सादरीकरण
हवा गणवत्ता चाचणी आणि स्वच्छ संस्थेचे प्रदर्शन

कला सादरीकरणाची संधी

सामान्य नागरिकांनाही या उपक्रमात त्यांची कला सादर करता येणार आहे. त्यासाठी लक्ष्मी रस्ता वाॅकिंज प्लाझा स्टेज नागरिकांसाठी खुले असेल. महापालिका अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन नागरिकांना सादरीकरण करता येणार आहे. पादचाऱ्यांच्या समस्यांची जाणीव व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. नागरिकांच्या प्रतिसादामुळे उपक्रमाचा उद्देशही साध्य होत असल्याचे दिसून येत आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून पुढील वर्षभर आवश्यक उपाययोजना केल्या जातात. निखिल मिझार, वाहतूक नियोजनकार, पुणे महापालिका वर्षभर पादचाऱ्यांना सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. ते दिल्यानंतर असे उपक्रम अवश्य राबवावेत. पादचारी धोरणाची महापालिकेकडून अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना किमान सुविधा देणे आवश्यक आहे.प्रशांत इनामदार, अध्यक्ष, पादचारी प्रथम संस्था

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmi road in punes madhya vasti will open for pedestrians only on december 11 pune print news apk 13 sud 02