लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातून जाणारा महत्वाचा आणि सतत वर्दळ अशी ओळख असलेला लक्ष्मी रस्ता बुधवारी बंद राहणार आहे. या रस्त्यावरून सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत कोणतीही वाहतूक होणार नाही. या रस्त्याचा वापर केवळ नागरिकांना चालण्यासाठी करता येणार असल्याने वाहनांपासून मुक्त रस्त्यावर फिरण्याचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे.

शहरातील बाजारपेठेचा मुख्य आणि महत्वाचा रस्ता अशी लक्ष्मी रस्त्याची ओळख आहे. दिवस रात्र हा रस्ता गर्दीने वाहत असतो. वर्षातील गणेश विसर्जनाचा दिवस वगळता हा रस्ता वाहतुकीसाठी कधीही बंद नसतो. मात्र बुधवारी हा रस्ता चक्क १२ तास वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

आणखी वाचा-सतीश वाघ हत्या प्रकरण : एका आरोपीला पकडण्यात यश, अन्य चार आरोपींचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू

पादचारी नागरिकांना केंदस्थानी ठेवून पुणे महापालिकेच्या वतीने बुधवारी पादचारी दिन साजरा केला जात आहे. शहरातील महत्वाचा रस्ता अशी ओळ‌ख असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर मुख्य कार्यक्रम होणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने ४७ लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून यामध्ये रस्त्याची स्वच्छता, डागडुजी, लोखंडी रेलिंगला रंगकाम ही कामे केली जाणार आहेत.

महानगरपालिकेच्या वतीने ११ डिसेंबरला पादचारी दिन साजरा केला जातो. या उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्षे आहे. पादचारी दिनानिमित्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्ता अशी ओळख असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर हा कार्यक्रम होणार असून यासाठी सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

नागरिकांमध्ये शालेय मुलांमध्ये पादचाऱ्यांच्या अधिकाराबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा केला जात असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण करणे, पादचारी मार्गाची दुरुस्ती, सुशोभीकरण, तसेच लोखंडी रेलिंगला रंगकाम करणे, कार्यक्रमासाठी मांडव उभारणे ही कामे केली जात आहे. मागील आठवड्यापासून ही कामे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेकडे सर्वात कमी दराची ४० लाख १२ हजार रुपयांची निविदा आली आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटीसह) या कामाचा खर्च ४७ लाख ३५ हजार इतका होणार आहे. या खर्चाला मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव महापालिकेच्या पथ विभागाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

आणखी वाचा-मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …

पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावर केवळ पादचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. कोणत्याही प्रकारची वाहने, बस, या रस्त्यावरून जाणार नाहीत. या उपक्रमांतर्गत लक्ष्मी रस्त्यावर विविध खेळ, पथनाट्य, गायन, वादन, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करुन नागरिकांना या रस्त्यावर येता येईल. लक्ष्मी रस्त्यावर येण्यासाठी नागरिकांना बस स्थानकापासून सायकल व्यवस्था देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पादचारी दिनाचा मुख्य कार्यक्रम लक्ष्मी रस्त्यावर होईल. मात्र, प्रत्येक परिमंडळात पाच चौकांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने पदपथ तसेच रस्त्यांचीही दुरुस्ती केली जाणार आहे, असे पथ विभाग प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.

पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेने पादचारी दिनाचे आयोजन केले आहे. मोठ्या संख्येने पुणेकर नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmi road will be closed again within three months after ganeshotsav pune print news ccm 82 mrj