पानिपत रणसंग्रामाला २६१ वर्ष झाल्याच्या निमित्ताने ६ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत लाल महाल ते पानिपत दुचाकी मोहीम काढण्यात येणार आहे. तसेच शौर्यज्योत घेऊन १ हजार ५०५ किलोमीटरचा धावत प्रवास करण्याचे नियोजन आहे.मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाच्या जागृतीसाठी विविध ७६ संस्थांच्या सशक्त भारत या समूहातर्फे पानिपत गौरवगाथा जागर अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत २०१२मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र करोना काळात ही मोहीम प्रतीकात्मक स्वरुपात काढण्यात आली होती.
हेही वाचा >>>पुणे: ‘ॲकॅडमिक क्रेडिट बँक’साठी साडेचार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; प्र-कुलगुरू संजीव सोनवणे यांची माहिती
आता पुन्हा लाल महाल ते पानिपत दुचाकी मोहीम होणार आहे. लाल महालापासून ही मोहीम सुरू होऊन आळंदी ,वढू बुद्रूक, सिंदखेड राजा, बुऱ्हाणपूरमार्गे पानिपत येथे पोहोचेल. त्यानंतर दिल्ली, आग्रा, ग्वाल्हेर, धुळे, नाशिक, शिवनेरी करून पुण्यात परत येईल. या मोहिमेदरम्यान ३७ भुईकोट, सात गिरीदुर्ग आणि २७ तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या जातील. तर २२ ठिकाणी मुक्काम करण्यात येईल. मोहिमेबाबत अधिक माहिती https://sashaktabharat.com या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच सहभागी होण्यासाठी ९६२३१३८९९९, ९६२३४५७७३६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.