लाल महालात घुसून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटलेल्या घटनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लाल महाल शिवतेज दिन उत्सव समितीच्या वतीने ‘लाल महालातील शिवतांडव’ या महानाटय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका डॉ. अमोल कोल्हे साकारणार आहेत, अशी माहिती समितीचे कार्यवाह सुनील तांबट यांनी रविवारी दिली.
ऐतिहासिक घटनेला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने १६ ते १८ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १६ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता चित्रकला व निबंध स्पर्धा, सायंकाळी पुण्यश्लोक जिजाऊ वंदन शोभायात्रा, महिला मेळावा, तर १७ एप्रिल रोजी शिवरायांचे युद्ध नेतृत्व या विषयावर शशिकांत पित्रे आणि पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान होणार आहे. या उत्सवाचा समारोप १८ एप्रिल रोजी ‘लाल महालातील शिवतांडव’ या महानाटय़ाने होणार असून त्याचे सादरीकरण गुरुवारी सायंकाळी शनिवारवाडय़ावर होणार आहे. या महानाटय़ाची रंगीत तालीम जोरात सुरू आहे, असेही तांबट यांनी सांगितले.