शासकीय मोटारींच्या टपावर लावण्यात येणाऱ्या लाल किंवा अंबर दिव्यांबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार शासनाने नवे आदेश काढल्यापासून लोकप्रतिनिधींपासून अधिकाऱ्यांची ‘प्रतिष्ठा’ आडवी आली. कारण नियम लागू होऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला असला तरी अनेकांनी दिवे काढले नाहीत किंवा नियमानुसार योग्य रंगाचे दिवे लावले नाहीत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून याबाबत संबंधितांना स्मरणपत्रेही पाठविण्यात आली, पण उपयोग झाला नाही..
पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी पोलिसांच्या गाडय़ांवरील अंबर दिवे काढून निळे दिवे लावण्याबाबत नुकतेच एक विधान केले अन् मोटारीवरील दिव्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. ‘दिवे बदलण्याचे आदेश काढणाऱ्या परिवहन आयुक्तांनीच आमच्या वाहनावरील दिवे बदलावेत’, असे माथूर म्हणाले होते. दिव्यांच्या प्रश्नावर प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही पुन्हा कंबर कसली असून, शासकीय मोटारींवर ग्राह्य़ नसणारे दिवे निघालेत की नाही किंवा परवानगी असणारेच दिवे मोटारींवर आहेत का, हे तपासण्यासाठी मोहीम आखण्यात आली आहे. त्यासाठी खास भरारी पथकेही स्थापन करण्यात येणार आहेत.
नव्या नियमांनुसार महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांसह अनेकांच्या वाहनांवरील लाल दिवे काढावे लागणार आहेत. त्यांना आता अंबर दिव्यावर समाधान मानावे लागणार आहे. पोलिसांच्या वाहनांना अंबर दिव्यांऐवजी निळे दिवे लावावे लागणार आहेत. वाहनांवरील लाल व अंबर दिवे लावण्याबाबत राज्य शासनाकडून ४ एप्रिलला सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. सुधारित अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सूचना काढल्या आहेत. अधिसूचनेनुसार ज्या वाहनांना दिवा वापरण्याची परवानगी नाही, अशांनी पूर्वीच्या शासन निर्णयानुसार दिवा लावला असल्यास तो तातडीने काढावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाल दिवा वापरणाऱ्या अनेकांना अंबर दिवा वापरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे काहींना अंबर दिवाही वापरण्याची परवानगी नाही.
सुधारित नियमावलीनुसार शासकीय वाहनांच्या दिव्यांमध्ये बदल केला की नाही, याची तपासणी करण्याचे अधिकार वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक, सहायक निरीक्षकांना देण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांनीच दिवे बदलले नसल्याने इतरांची तपासणी कशी करणार, असा प्रश्न आहे. आता आरटीओ त्यासाठी सरसावली असल्याने पुढील काळात कुणाकुणाची ‘प्रतिष्ठा’ पणाला लागते, हे स्पष्ट होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा