पुणे : ‘पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी बाधित शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांत संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे,’ असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘बाधित सात गावांतील शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, परस्पर जमिनींची विक्री करू नये. नक्कीच त्यांना योग्य मोबदला मिळेल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात डुडी बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे या वेळी उपस्थित होते. पुरंदर विमानतळ जुन्याच जागी होणार असल्याचे स्पष्ट करून भूसंपादनाबाबत कार्यवाही सुरू करण्यासाठी संवाद साधण्यासाठी सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.
डुडी म्हणाले, ‘पुरंदर विमानतळासाठी दोन हजार ८०० हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) २०१३ च्या कायद्यानुसारच शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वेच्छेने सहमती दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपटींनी मोबदला देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. जमिनीची मोजणी, बागायती, जिरायती क्षेत्र, नैसर्गिक स्रोत, विहीर, झाडे, फळझाडे आदींनुसार मोबदला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संवाद नसल्याने चुकीच्या भूलथापांना बळी पडल्याचे दिसून आले आहे. मात्र, अनेक शेतकरी स्वत:हून किती मोबदला मिळणार आदी चौकशी करून सहमती दर्शविण्यासाठी तयार असल्याचेही अधोरेखित झाले आहे.’
‘आतापर्यंत चार गावांत बैठका घेऊन स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. तर येत्या आठवडाभरात उर्वरित तीन गावांतील शेतकऱ्यांबरोबर बैठका घेऊन संवादाची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर फेरसर्वेक्षण आणि मोजणी प्रक्रिया पूर्ण करून येत्या सहा महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल,’ अशी ग्वाही डुडी यांनी दिली.
‘शेतीतून उन्नती प्रकल्प’
कृषी क्षेत्राबाबत पुढील पाच वर्षांसाठी कृषी विकास आराखडा तयार करण्यात येत असून, ‘शेतीतून उन्नती’ हे प्रकल्प अभियान राबविले जाणार आहे. देशभरातून मागणी असलेले पुरंदरमधील अंजीर, महाबळेश्वर आणि आंबेगावमधील स्ट्राॅबेरी, इंदापूरमधील सूर्यफूल, जुन्नरमधील आंबा ही पाच पिके निवडून विशेष निर्यात धोरणसंबंधी आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी येत्या जूनमध्ये ‘कृषी हॅकेथाॅन’ तसेच पर्यटन क्षेत्रातील विकासासाठी ‘टुरिझम हॅकेथाॅन’, औद्योगिक क्षेत्रासाठी ‘टूल हब सेंटर’, ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सुलभ शिक्षण व्यवस्थेसाठी शाळा असे नियोजन करण्यात आले आहे.
वर्तुळाकार रस्त्यासाठी तीन महिन्यांत भूसंपादन
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनाला वेग आला आहे. येत्या तीन महिन्यांत ९० टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण करून देण्याबाबतचा विश्वासही जिल्हाधिकारी डुडी यांनी व्यक्त केला.