महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्ता प्रकल्पातील बाधित गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. समांतर पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून गावनिहाय सुनावणी प्रक्रियेद्वारे भूसंपादनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षात प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. त्याकरिता रस्ते महामंडळाकडून जानेवारीअखेरीस निविदा काढण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांब आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता हाती घेतला आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागात मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहेत. प्रकल्पासाठी ६९५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्यानुसार जमिनींच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. तसेच राज्य सरकारकडून पुरवणी अंदाज पत्रिकेत दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पुणे : सहकारी तत्त्वावर तांदळाचे उत्पादन; सोमवारपासून इंद्रायणी तांदूळ महोत्सव
याबाबत बोलताना महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील बाधित होणाऱ्या सर्व गावांची मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच बाधित गावांची निवाडा प्रक्रिया सुरू असून प्रांतनिहाय सुनावणी सुरू आहे. त्यानुसार भूसंपादन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून जानेवारीपर्यंत भूसंपादन पूर्ण होणार असून त्यानंतर लगेचच निविदा काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे.’
प्रकल्पाची निविदा सुमारे २२ हजार कोटी रुपयांची असणार असून गृहनिर्माण व शहरी विकास महामंडळाकडून (हुडको) दहा हजार २०० कोटी रुपये रस्ते महामंडळाला कर्ज मंजूर झाले आहेत. गरज पडल्यास हुडकोकडून वाढीव तरतुदीनुसार अधिक रकमेबाबत मागणी करण्यात येईल. त्यामुळे भूसंपादनापोटी द्यायच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. परिणामी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे, असेही वसईकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रकल्प विभागाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांनी पुण्याच्या वर्तुळाकार रस्त्याबाबत युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मूल्यांकन प्रक्रिया पार पडली आहे. भूसंपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठका घेऊन प्रांताधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत. पुरेसा निधी मिळाल्याने भूसंपादनाला गती आली असून जानेवारीअखेर प्रकल्पाची निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
– राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी