भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यंदा प्रथमच भरती परीक्षेच्या निकालानंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. काही कारणांनी नियुक्त झालेले उमेदवार हजर झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
गेल्या वर्षभरापासून विविध कारणांनी पुढे ढकलण्यात आलेली भूमी अभिलेख विभागाकडून १११३ भूकरमापक (सर्व्हेअर) पदासाठी नुकतीच परीक्षा घेण्यात आली. पुणे विभागात २६३, नागपूर विभागात १८९, कोकण-मुंबई विभागात २४४, नाशिक विभागात १०२, औरंगाबाद २०७, तर अमरावती विभागात १०८ जागा रिक्त आहेत. अशा एकूण १११३ जागा भरण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>>पुणे : ऑनलाइन माध्यमातून नेमलेल्या नोकरानं ज्येष्ठ दांपत्याचे लुटले २४ लाखांचे दागिने
याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘परीक्षा घेतलेल्या आयबीपीएस कंपनीला आरक्षणनिहाय बिंदुनामावली पाठविण्यात आली आहे. त्यानुसार या कंपनीकडून जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्याकडे यादी येणार आहे. विभागनिहाय गुणवत्तायादी १५ डिसेंबरला भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. या परीक्षेला राज्यभरातून प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ४८ हजार ११० उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरले. त्यापैकी ३२ हजार ६३ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामधून १११३ उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.’
हेही वाचा >>>तब्बल आठ टीएमसी पाणी गळतीचे खापर पुणेकरांवर, महापालिका प्रशासनाचा अजब कारभार
दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे विभागीय अधिकारी जिल्हा वाटप करतील. या जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरावर या उमेदवारांना सहायक भूकरमापक म्हणून कामाचा अनुभव दिला जाणार आहे. या दरम्यान संबंधित उमेदवारांचे काम, त्यांना या कामात किती रस आहे, हे समजणार आहे. त्यानंतर औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी येथे जून महिन्यात ९० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही उमेदवार निकालानंतर एक महिन्यात रुजू न झाल्यास किंवा रुजू झालेले उमेदवार काही कारणांनी सोडून गेल्यास जागा रिक्त राहू नयेत म्हणून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे, असेही रायते यांनी स्पष्ट केले.