लोणावळा : मुंबई-पुणे लोहमार्गावर मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान दरड कोसळली. या परिसरात असलेल्या सुरक्षारक्षकाच्या केबिनवर दरडीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचे सांगण्यात आले.
मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास दरड कोसळली. रेल्वे प्रशासनाकडून या भागात सुरक्षारक्षकांसाठी केबीन ठेवण्यात आली आहे. दरडीचा काही भाग केबीनवर कोसळला. त्या वेळी केबिनमध्ये एक कर्मचारी होता. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दगड, मातीचा ढिगारा बाजूला केला. रेल्वे वाहतुकीतील अडथळे हटविण्यात आले. दरडीचा काही भाग ओव्हरहेड वायरवर पडला होता. तातडीने ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करण्यात आली.
मंकी हिल ते ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे दोन वर्षांपूर्वी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर या भागात दरड कोसळू नये म्हणून डोेंगर कपारींना जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. दरड पडल्याची माहिती उपलब्ध होण्यासाठी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात एखादी दुर्घटना घडल्यास त्वरीत माहिती उपलब्ध होते.