पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याला (इनर रिंग रोड) गती देण्याच्या दृष्टीने जमिनींच्या मोजणी प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत गावांमधील जमीन मोजणीचे टप्पे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले असून मंगळवारी वडाचीवाडी या गावातील १६.५ हेक्टर जागेची मोजणी करण्यात आली.

दरम्यान, जमीन मोजणी प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर जमीन मालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र देण्यास सुरुवात झाली असून बुधवारी (१९ मार्च) आंबेगाव खुर्द गावातील जमिनीची मोजणी होणार आहे.

शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएने दोन रिंग रोडची निर्मिती करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार बाह्य रिंग रोडचे (आउटर रिंग रोड) काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एसएसआरडीसी) देण्यात आले असून, अंतर्गत रिंग रोडचे काम (इनर रिंग रोड) पीएमआरडीएकडून करण्यात येणार आहे. हा रिंग रोड ८३ किलोमीटर लांबीचा असून, त्यासाठी १४ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या अंतर्गत वर्तुळाकार रस्त्यासाठी १३ गावातील ११५ हेक्टर जागेचे संपादन जिल्हाधिकारी कार्यालयाने करावे, असा प्रस्ताव पीएमआरडीएकडून देण्यात आला होता. त्यानुसार गेल्या काही दिवसांपूर्वी बैठकही झाली होती. त्यानंतर गावातील जमीन मोजणीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. भूसंपादनासाठी पीएमआरडीएकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला ११३ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यासाठी ३० टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे. खेड, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील ४४ गावांमधून ७४३.४१ हेक्टर जमीन या रिंगरोडसाठी आवश्यक आहे. हा अंतर्गत रिंग रोड पुणे-सातारा रस्त्याला नगर रस्त्याशी जोडणार आहे. त्यामध्ये ४२ जोड रस्ते, १७ पूल आणि १० बोगद्यांचा समावेश आहे. तसेच मेट्रो मार्गिकेसाठी पाच मीटर रुंदीची जागाही आरक्षित ठेवली जाणार आहे.

रिंगरोडसाठी जमिन मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून वडाचीवाडी येथील १६.५ हेक्टर जागेची मोजणी मंगळवारी करण्यात आली. जमीन मालकांकडून संमतीपत्र देण्यासही सुरुवात झाली आहे. आंबेगाव खुर्द येथे पुढील टप्प्यात मोजणी केली जाईल. – कल्याण पांंढरे, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन

या गावातील भूसंपादनाचा प्रस्ताव

वडाची वाडी, भिलारेवाडी, पिसोळी, येवलेवाडी, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, निगरुडी, कदमवाकवस्ती, सोलू आणि वडगाव शिंदे

Story img Loader