पुणे : तुकडेबंदी कायद्यात अखेर राज्य सरकारने शिथिलता आणली आहे. चार कारणांसाठी एक-दोन गुंठे जमिनींची खरेदी-विक्री करता येणार आहे. राज्य सरकारने ५ मे २०२२ रोजी राजपत्र प्रसिद्ध केले होते. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिरायत जमिनीसाठी २० गुंठे, बारामती जमिनीसाठी दहा गुंठे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले. म्हणजेच या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन खरेदी-विक्री होणार नाही. काही शेतकऱ्यांना रस्ते, विहीर आदी कारणांसाठी एक-दोन गुंठ्यातील जमीन खरेदी-विक्री करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केली आहे. कायद्यात सुधारणा करण्याबाबतचे प्रारूप राज्य सरकारने १४ जुलै २०२३ रोजी जाहीर केले होते. या प्रारूपावर मागविण्यात आलेल्या हरकती, सूचना निकाली काढून प्रारूप अंतीम करण्याचे राजपत्र १४ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विहीर, शेतरस्ता, सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी आणि केंद्र किंवा राज्य सरकारच्या ग्रामीण घरकूल योजनेच्या प्रयोजनासाठी तुकड्यातील जमिनींचा व्यवहार करता येणार आहे. मात्र, याकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे. विहिरींसाठी नमुना १२ मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करताना त्यासोबत पाण्याच्या उपलब्धतेचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे ना-हरकत प्रमाणपत्र, संबंधित खरेदीदाराने किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेले असावे, जिल्हाधिकारी विहिरीसाठी कमाल पाच गुंठ्यांपर्यंत (पाच आर) जमिनीच्या हस्तांतरणाला मंजूरी देऊ शकतील. अशा जमिनींच्या विक्री खतानंतर विहिरीच्या वापरासाठी मर्यादित, असा शेरा सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात नोंदविला जाणार आहे.

हेही वाचा >>>वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

शेतरस्त्यासाठी अर्ज करताना सोबत शेतरस्त्याचा कच्चा नकाशा जोडावा लागेल. जिल्हाधिकारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित रस्त्याचा अहवाल तहसीलदारांकडून मागवतील, जिल्हाधिकारी शेतरस्त्यासाठी जमिनीचे हस्तांतरण करण्यास परवानगी देतील. या जमिनीच्या विक्री खतानंतर जवळच्या जमीनधारकांना वापरासाठी शेतरस्ता खुला राहील, अशी नोंद सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात करण्यात येईल. सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीचे भूसंपादन झाल्यानंतर शिल्लक जमिनीच्या हस्तांतरणासाठी अर्ज करताना त्यासोबत भूसंपादनाच अंतीम निवाडा किंवा कमी-जास्त प्रमाणपत्र (कजाप) जोडावे लागेल. त्यानंतर जिल्हाधिकारी कागदपत्रांची पडताळणी करतील आणि हस्तांतरणाला मंजूरी देतील. ग्रामीण घरकूल लाभार्थ्यांसाठी अर्ज करताना जिल्हाधिकारी लाभार्थ्यांची अर्जदाराची ओळख पटविण्याची खात्री करतील. ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एक हजार चौरस फुटांपर्यंत जमिनीचे हस्तांतरण करण्यास मंजुरी देतील.

विहीर, शेतरस्ता किंवा घरकुलाच्या लाभासाठी जमिनीच्या हस्तांतरणाला जिल्हाधिकारी हे एक वर्षासाठीच मंजूरी देतील किंवा अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील दोन वर्षांसाठीच मुदतवाढ देता येणार आहे. ज्या कारणासाठी हस्तांतरणाची मंजूरी मिळाली, त्याच कारणासाठी जमिनीचा वापर करणे बंधनकारक आहे. अन्यथा मंजूरी रद्द करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land will be bought and sold as the state government has amended the fragmentation act pune print news psg 17 amy