घाटमाथा व पश्चिम महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. महामार्ग पोलिसांच्या पुणे विभागाने दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची पाहणी करून संबंधित यंत्रणांना कळविले आहे. मात्र, काही ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या असल्या तरी अनेक ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणांवर लक्ष देण्याची गरज आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये द्रुतगती मार्गावर खंडळा बोगद्याजवळ दरड कोसळून मुंबईकडे जाणारा रस्ता बंद आहे. तर, मांढरदेवीजवळील भोरच्या घाटातही दरड कोसळली आहे. मंगळवारी कात्रज व माळशेज घाटात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरील डोंगर परिसरातून वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे झाले आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्ग पोलिसांनी दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहिती रस्ते विकास महामंडळ, आयआरबी व रस्त्याची कामे पाहणाऱ्या संबंधित यंत्रणांना दिली आहे. या ठिकाणांवर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
द्रुतगती मार्गावर डोंगराच्या परिसरात असलेल्या ठिकाणी जाळी बसविण्यात आली आहे. मात्र, सोमवारी सकाळी मोठे दगड कोसळून जाळीसह रस्त्यावर आले होते. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक झाले आहे. याबाबत आयआरबीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून कळविण्यात आले आहे. तसेच, महामार्ग पोलिसांच्या हद्दीतील असलेले द्रुतगती मार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग, नाशिक महामार्गावरील घाट, खंबाटकी घाट, कात्रज घाट येथील ठिकाणांची पाहणी करून आवश्यक असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे, अशी माहिती पुणे महामार्ग विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुधीर अस्पट यांनी सांगितले.
महामार्ग पोलिसांनी धोकादायक ठिकाणांची माहिती दिली असताना देखील अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. महामार्ग पोलिसांच्या पत्र्यव्यवहाराकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यापूर्वीच ही सर्व कामे करणे अपेक्षित असते. पण, आता पावसाळा सुरू झाला तरी अनेक ठिकाणी कामे झालेली नाहीत. अनेक ठिकाणांच्या जाळ्यासुद्धा जुन्या झालेल्या आहेत, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांमधील सूत्रांनी दिली.

महामार्ग पोलिसांच्या स्थानिक पोलीस निरीक्षकांनी दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहिती काढून संबंधित यंत्रणांना कळविले आहे. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्याबाबत रस्त्याचे काम पाहणाऱ्या कंत्राटदारांना याबाबत सूचना दिल्या आहेत. द्रुतगती मार्गावरील खंडाळा येथे दरड कोसळलेल्या ठिकाणाची जाळी ही २००९ साली बसविण्यात आली होती. त्यामुळे जुन्या झालेल्या जाळ्या बदलाव्यात, अशी सूचना आयआरबीला केली आहे.
– महामार्ग पोलीस अधीक्षक एस. जी. सोनवणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा