पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भविष्यात दरड कोसळण्याच्या घटना टाळण्याच्या दृष्टीने खंडाळा बोर घाटात बोगद्याजवळील डोंगरभागाचे भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकामंत्री एकनाथ िशदे यांनी दिली.
शनिवारी दुपारी खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळली होती. या दरडीची तसेच घटनास्थळावर परिस्थितीची पहाणी करण्यासाठी शिंदे व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी घटनास्थळाला भेट दिली. दोन्ही मंत्र्यांनी तज्ज्ञांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. या वेळी िशदे म्हणाले, या मार्गाला आता पंधरा वष्रे झाली असून पावसाळी वातावरणामुळे येथील दगडांची झिज होऊन ते सुटे झाले आहेत. त्यामुळे दरडी कोसळत असल्याची वस्तुस्थिती असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या भागाचे भारतीय तसेच परदेशी तज्ज्ञांमार्फत भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हा मार्ग भविष्यात प्रवासासाठी संपूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे.
दरम्यान, खंडाळा बोर घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.  दरड कोसळल्यानंतर परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने येथे काम सुरू करण्यात आले असून या दरडग्रस्त परिसरामध्ये एक किलोमीटर अंतरात पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पर्याय म्हणून या मार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक लोणावळा येथून पुणे-मुंबई महामार्गावरून वळविण्यात आली असून खंडाळ्याच्या दस्तुरी येथे ती पुन्हा द्रुतगती मार्गाला जोडण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावरील मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरील दोन मार्गिका पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुल्या ठेवून एक मार्गिका मुंबईकडे जाणाऱ्या अवजड तसेच इतर वाहनांसाठी खुली करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत हीच व्यवस्था कायम ठेवण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलिसचे अधीक्षक सुनील सोनावणे यांनी सांगितले.

Story img Loader