भारतीय भाषांच्या अभ्यासाकडे विद्यार्थ्यांच्या प्रतिसाद दिवसेंदिवस घटताना दिसत आहे. महाविद्यालयांमध्ये पदवीपर्यंत शिकवण्यात येणाऱ्या मराठी, हिंदी, संस्कृत या भाषांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला असल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदवले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भाषा विषय घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जवळपास पन्नास टक्क्य़ांनी कमी झाले आहे.
पुणे हे भाषा अभ्यासाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात होते. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, इंग्लिश या भाषांबरोबरच परदेशी भाषांच्या शिक्षणासाठीही पुण्याची ओळख आहे. परदेशी भाषा शिक्षणाला पुण्यात विद्यार्थ्यांकडून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, त्याच वेळी भारतीय भाषांचे विभाग विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय भाषांना मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटला असल्याचे शिक्षक सांगतात. मराठी, हिंदी, संस्कृत या भाषांचे शिक्षण प्रामुख्याने महाविद्यालयीन स्तरावर होते. कला शाखेची पदवी घेताना विशेष विषय म्हणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्राधान्य हे भाषा विषयासाठी कमी असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये संस्कृत भाषेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमतेपेक्षा विद्यार्थी कमी मिळत आहेत. मराठी, हिंदी, संस्कृत या तीन भाषांमध्ये मराठी भाषेची स्थिती सध्या तुलनेने बरी असली, तरी या भाषेच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही कमीच होते आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भाषा विषय घेऊन पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पन्नास टक्क्य़ांनी घटले आहे.
सध्या शालेय स्तरापासूनच परदेशी भाषांचे शिक्षण मिळते. शाळाही आवर्जून एखादी परदेशी भाषा अभ्यासक्रमात ठेवत आहेत. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयामध्येही मराठी माध्यमाला मराठी भाषा घेणे बंधनकारक आहे. मात्र, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना भाषेला पर्यायी विषय घेता येतात. त्यामुळे भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण या टप्प्यावर आणखी कमी होते. त्यानंतर मुळातच या दोन टप्प्यांमध्ये कमी कमी होत आलेल्या विद्यार्थ्यांपैकी भाषा हा विशेष विषय घेऊन पदवी घेणारे विद्यार्थी खूपच कमी झाले आहेत. यापूर्वी डीएड. बीएड करू इच्छिणारे विद्यार्थी आवर्जून भाषा विषयाचे शिक्षण घेत होते. मात्र, या विद्यार्थ्यांच्या नोक ऱ्यांवरही परिणाम झाल्यामुळे भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे, असे मराठीच्या प्राध्यापिका स्नेहल तावरे यांनी सांगितले.
हौस म्हणून भाषा शिक्षणाकडे कल
एखाद्या क्षेत्रात काम करत असताना हौस म्हणून भाषेचे शिक्षण घेण्याकडे कल वाढत आहे. अनेक डॉक्टर, अभियंते हे भाषा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. दुसऱ्या एखाद्या शाखेतील पदवी असताना स्पर्धा परीक्षा द्यायची आहे म्हणून भाषा विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठीही विद्यार्थी येत आहेत. मात्र, भाषा विषयांचे विभाग सध्या नियमित विद्यार्थ्यांच्या शोधात आहेत.
भाषेच्या अभ्यासालाही मागणी
भाषांतर, कॉल सेंटरमध्ये नोकरी, मुद्रितशोधन, प्रकाशन व्यवसाय, अध्यापन या क्षेत्रांमध्ये भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मागणी आहे. संस्कृत भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन संस्था, अध्यापन या क्षेत्रांमध्ये मागणी आहे.
संस्कृतकडे परदेशी विद्यार्थ्यांचा ओढा
संस्कृत ही भाषा मराठी, हिंदी या भाषांच्या जवळची, मात्र संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे परदेशी विद्यार्थ्यांचा ओढा आहे. पुणे विद्यापीठातील संस्कृत भाषा विभागामध्ये जर्मन, अमेरिकन, फ्रेंच विद्यार्थी संस्कृत भाषेचे शिक्षण घेत आहेत. संशोधन आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी परदेशातून विद्यार्थी आवर्जून येतात. पाली भाषेच्या अभ्यास करण्याकडेही परदेशी विद्यार्थ्यांचाच ओढा जास्त आहे, असे पुणे विद्यापीठाच्या संस्कृत आणि प्राकृत भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा कात्रे यांनी सांगितले.

Story img Loader