परदेशी वास्तव्य असल्यामुळे मातृभाषेपासून दुरावलेल्या युवा पिढीच्या मनात मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी भाषा संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. जगभरातील ६० देशांत राहणाऱ्या मूळ मराठी मंडळींना मराठीशी जोडून घेण्याचा प्रयत्न असून, गणेशोत्सवापासून त्याचा श्रीगणेशा होत आहे.
‘दूरदेशीही नांदे, माझी मराठी आनंदे’ हे या उपक्रमाचे ब्रीद आहे. या उपक्रमांतर्गत परदेशातील मराठी बांधवांची पुन्हा मराठीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याच्या भाषा संचालक डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी दिली.
जगभरातील अनेक देशांमध्ये मराठी माणसे विखुरली आहेत. त्यांची भावी पिढी ही तेथेच जन्माला आल्यामुळे मराठीपासून दुरावली गेली आहे. गणेशोत्सवाचा सण जगभरातील मराठी माणसे आपापल्या देशामध्ये एकत्र येऊन साजरा करतात. हे औचित्य साधून या उपक्रमाचा श्रीगणेशा केला जाणार आहे. परदेशामध्ये वास्तव्य असलेल्या मराठी कुटुंबीयांसाठी, विशेषत: त्यांच्या मुलांसाठी विविध स्पर्धासह अन्य उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले असून, परदेशामध्ये वास्तव करीत असलेल्या सुमारे ५० देशांतून त्यासंदर्भातील ई-मेल्स भाषा संचालनालयाकडे आल्या आहेत. हा उपक्रम स्पर्धात्मक स्वरूपाचा असून त्यामध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे, असेही डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा