भाषा ही संस्कृतीची वाहक असते. सावरकरांसारखा महापुरुष भाषा हे हत्यार म्हणून वापरत असे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनात मराठी भाषेच्या विकासाची जी तळमळ होती ती आपल्यात रुजविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांनी येथे व्यक्त केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वा. सावरकर स्मृती आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात डॉ. ढेरे बोलत होत्या.  या स्पर्धेत यंदा मुंबईतील पाल्र्याच्या साठय़े महाविद्यालयाच्या संघाने सांघिक विजेतेपद, तर पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या विश्वजित आवटे याने वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. यंदाच्या स्पर्धेसाठी ‘प्रमाणित भाषेचा आग्रह’असा विषय देण्यात आलेला होता.
ढेरे म्हणाल्या, की भाषा ही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाशी आणि विचारांशी जोडलेली असते. भाषा प्रमाणित की अप्रमाणित या पेक्षाही ती आपली ‘माउली’ आहे. तिला समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे.
प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे म्हणाले,की विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आणि विविध संदर्भ तपासण्याची वृत्ती हल्ली कमी झाली आहे. कोणतीही गोष्ट सहजपणे मिळाली पाहिजे अशी सार्वत्रिक वृत्ती वाढली आहे. अशा स्पर्धामधून संदर्भासहित अभ्यासाची सवय जडते. या वेळी ढेरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम क्रमांक (सांघिक विभाग) – साठय़े महाविद्यालय (विलेपार्ले), उपविजेते ( गोगटे महाविद्यालय, रत्नागिरी) वैयक्तिक विजेते – प्रथम – विश्वजित आवटे, द्वितीय – ऐश्वर्या धनावडे, तृतीय – हर्षद तुळपुळे, उत्तेजनार्थ – रविशा साळुंखे, हुमेरा ठाकूर.

Story img Loader