पुणे महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे नदीकाठ परिसराची अस्वच्छता झाली आहे. विशेष म्हणजे महापालिका भवन परिसरातील नदीकाठ जलपर्णी, कचऱ्याच्या विळख्यात अडकला आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून मुळा-मुठा नदीकाठाचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याची घोषणा करणाऱ्या महापालिकेला हा प्रकार का दिसत नाही, अशी विचारणा सजग नागरिकांकडून सुरू झाली आहे.
हेही वाचा- सातारा : १०० वर्षांच्या वृक्षाचा नव्या मातीत मोकळा श्वास! पुनरुज्जीवित वटवृक्षाचा आज वाढदिवस
महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील नदीपात्रात जलपर्णी आणि विविध प्रकारचा कचरा वाहत आला आहे. बांधकामांचा राडारोडा, वेडीवाकडी वाढलेली झाडे-झुडपे आणि दुर्गंधीमुळे या परिसरातील नदीकाठाची अवस्था दयनीय झाली आहे. जी-२० परिषदेच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने महत्त्वाकांक्षी नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेचे सादरीकरण परदेशी पाहुण्यांपुढे केले. प्रत्यक्षात मात्र महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नदीकाठाला कचऱ्याचे स्वरूप आले आहे, याकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ एखाद्या परिषदेच्या निमित्ताने किंवा पंतप्रधान, राष्ट्रपती या सारख्या अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या पुणे दौऱ्यावेळीच केवळ नदीपात्रातील स्वच्छतेकडे लक्ष दिले जात आहे का, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला आहे.
हेही वाचा- पुणे : तीन वर्षांत कसब्यातील मतदारांत १५ हजाराने घट; चिंचवडमध्ये ४८ हजार मतदार वाढले
नदीकाठ संवर्धन आणि जायका प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा मार्च २०२२ रोजी झाले. त्या वेळी पंतप्रधानांचा ताफा ज्या रस्त्याने जाणार होता, त्या रस्त्यावरील दुभाजक चकचकीत करण्यात आले. रस्त्याच्या कडेच्या नदीपात्राची तातडीने स्वच्छता करण्यात आली. मात्र त्यानंतर नदी स्वच्छतेकडे आणि शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सुराज्य संस्थेचे सदस्य आशिष भोसले यांनी सांगितले. तशी तक्रारही त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी चौकाचौकातील कचरा पेट्या बंद केल्या आहेत. कंत्राटी पद्धतीने कचरावेचकांच्या मार्फत कचरा उचलण्याचे काम चालू केले. मात्र त्यांच्याकडे कचरा देण्याऐवजी नागरिक रस्त्यावरच कचरा फेकत आहेत. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि निर्णयामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेली मुळा-मुठा नदी आणि नदीकाठाची दुरवस्था झाली आहे. नदीपात्रात कचरा, बांधकामांचा राडारोडा टाकला जात आहे. त्यातून नागरिकांच्या अनोराग्याचा प्रश्नही निर्माण झाल्याचे आशिष भोसले यांनी सांगितले.