पुणे प्रतिनिधी : हरे राम हरे कृष्णा…जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्रा… चा अखंड जयघोष, वरुणराजाची संततधार आणि भाविकांचा मोठा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात पुण्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा सोहळा जल्लोषात साजरा झाला. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.
स.प.महाविद्यालय येथून निघालेली यात्रा अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे स.प.महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप झाला. ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यात्रेत अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी झाले होते. सायंकाळी आरती, दर्शन व महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले
आणखी वाचा-अमळनेर येथील ९७ व्या साहित्य संमेलनाच्या तारखा, संमेलनातील कार्यक्रमही ठरले!
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले, इस्कॉनचे वरिष्ठ संन्यासी प.पू.लोकनाथ स्वामी महाराज, प.पू.प्रबोधानंद सरस्वती स्वामी महाराज, प.पू.श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज, रथयात्रेचे मार्गदर्शक व इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष रेवतीपती दास, रथयात्रा समन्वयक अनंत गोप दास सहभागी झाले होते.
रथयात्रेतील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट करण्यात आली. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी व भाविकांनी ओढला. संपूर्ण रथयात्रेदरम्यान तब्बल ७० हजार भाविकांना महाप्रसादाच्या पाकिटांचे वाटप आणि १० हजार भक्तांना भोजन देण्यात आले. विविध प्रकारचे वाद्यवादन व वेशभूषा केलेले कलाकार देखील रथयात्रेत सहभाग झाले.