“राहुल बजाज हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांनी आम्हाला जगण्याची नवी उमेद दिली. लाखो कुटुंब उभी केली आहेत.” असे म्हणत कामगार भावनिक झाले तर काही जणांना अश्रू अनावर झाले. ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचं काल (शनिवार) पुण्यात उपचारादरम्यान निधन झालं. यानंतर पिंपरी-चिंचवड परिसरात शोककळा पसरली आहे, या भागात बजाज कंपनी असून मोठ्याप्रमाणावर कामगारवर्ग स्थायिक झालेला आहे. तर आज (रविवार) राहुल बजाज यांचे पार्थिव आकुर्डी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले असून त्यांचे नातलग, बजाज कंपनीचे कामगार, नेतमंडळी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल बजाज कालवश; सामाजिक जाणिवेचा उद्योगपती हरपल्याची भावना

राहुल बजाज यांच्या निधनामुळे बजाजच्या कामगारांवर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून कामगार त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आले आहेत. यावेळी काही कामगारांनी भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

साताऱ्यातील हजारो कुटुंब त्यांच्यामुळ उभी आहेत –

साताऱ्यातून आलेल्या दुर्योधन वरणेकर म्हणाले की, “राहुल बजाज यांना आम्ही देव समजतो. ते आमचे ईश्वर आहेत. आम्ही साताऱ्याहून आलेलो आहोत. महाराष्ट्र स्कुटरचे कामगार आहोत. २५ वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांनी आमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला होता, ते स्वतः आले होते. आम्हाला त्यांनी रोजगार दिला. साताऱ्यातील हजारो कुटुंब त्यांच्यामुळ उभी आहेत. अतिशय दुःख झालं आहे, मी भावनिक झालोय, मी १९९० पासून कंपनीत काम करतोय.” 

कामगारांना मी वाऱ्यावर सोडणार नाही असं ते म्हणायचे –

तसेच सूर्यकांत देसाई म्हणाले की, “राहुल बजाज यांनी हजारो हाताला काम दिलं. अनेक चढ उतार आले. त्यावेळी स्वतः राहुल बजाज हे महाराष्ट्र स्कुटर येथे आले. त्यांनी सांगितलं की उत्पादन कमी झालं म्हणून घाबरू नका. हा बजाजचा कामगार आहे याला मी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना इतर ठिकाणच्या उद्योगात सामावून घेऊ. एवढा मोठा आधार त्यांनी कामगारांना दिला होता. राहुल बजाज यांच्यामुळे मुलांचं शिक्षण झालं घर चाललं, त्यांच्यामुळे जगण्याच बळ मिळालं.” असे म्हणताच त्यांना अश्रू अनावर झाले.

राहुल बजाज यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी चार वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Large crowd of workers for rahul bajajs funeral msr 87 kjp
Show comments