दत्ता जाधव
पुणे : देशातून होणाऱ्या डाळिंब निर्यातीत मोठी घट आली आहे. २०२०-२१मध्ये देशातून सुमारे ७० हजार टन डाळिंबांची निर्यात झाली होती. २०२१-२२मध्ये ती ५० हजार टनांच्या आसपास असेल. या पूर्वी देशातून होणाऱ्या निर्यातीत राज्याचा वाटा शंभर टक्के असायचा, आता गुजरातमधूनही निर्यात सुरू आहे.
सोलापूर, पुणे, सांगली, अहमदनगर जिल्ह्यातून उत्पादित होणाऱ्या निर्यातक्षम दर्जाच्या डाळिंबाची आखाती देशांना मोठी निर्यात होत होती. गेल्या दोन वर्षांपासून इंदापूर, सोलापूर, सांगोला, अहमदनगर भागांत चांगला पाऊस होत आहे. मात्र, या पावसामुळे डाळिंब बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खोडकिडीमुळे हजारो हेक्टरवरील बागा नष्ट झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील डाळिंब पट्टय़ातून होणारी निर्यात जवळपास ठप्प झाली आहे.
डाळिंब उत्पादक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातून होणारी डाळिंब निर्यात शंभर टक्के महाराष्ट्रातूनच होत होती. २०२०-२१मध्ये सुमारे ७० हजार टन निर्यात झाली होती. विविध प्रतिकूल बाबींचा परिणाम म्हणून यंदा ही निर्यात ५० हजार टनांवर आली आहे. त्यातही गुजरातमधून निर्यात होऊ लागली आहे. गुजरातमधील जामनगर आणि अहमदाबादशेजारील भागांत डाळिंब लागवड वाढली आहे. यंदाच्या ५० हजार टनांत गुजरातचा वाटा २० टक्क्यांवर गेला आहे. गुजरातमधील डाळिंबाची मुख्यत्वे कांडला बंदरातून निर्यात होते.
प्रतिक्रिया
डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत आम्ही माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांना खोडकिडीसह अन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठांकडून पुरेसे मार्गदर्शन मिळालेले नाही. पुन्हा लागवड करण्याचा खर्च मोठा असल्यामुळे शेतकरी त्यासाठी इच्छुक नाहीत. राज्य सरकार फळबागा लागवडीसाठी नव्याने योजना आणत आहे. हेक्टरी आठ लाखांपर्यंत अनुदान मिळणार असल्याची चर्चा आहे. या योजनेत डाळिंबाचा समावेश केला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.-प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, डाळिंब उत्पादक संघटना
या राज्यांत उत्पादन
देशाच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत आहे. त्यानंतर अनुक्रने कर्नाटक, गुजरात, आंध प्रदेश, तमिळनाडू राज्यांचा क्रमांक लागतो. निर्यातीतही आजवर महाराष्ट्राचा वाटा शंभर टक्क्यांवर होता. आता गुजरातमधून निर्यात होऊ लागली आहे. आखाती देशांसह बांगलादेश, नेदरलॅण्ड, ब्रिटन, रशिया, थायलंड हे देश डाळिंबाचे मोठे ग्राहक आहेत.
डाळिंब बागांची सद्य:स्थिती
’राज्यात एकूण १ लाख ४३ हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड होती. त्यातील ५० टक्के बागा खोडकिडीसह अन्य कारणांमुळे काढून टाकण्यात आल्या आहेत.
’अजून २० टक्के बागा काढून टाकाव्या लागणार आहेत. राज्यात डाळिंब बागांची झालेली ही हानी लवकर भरुन निघणारी नाही. विशेषकरून इंदापूर, आटपाडी, सांगोला भागात झालेले नुकसान मोठे आहे.
’शेतकरी नव्याने लागवड करण्यास इच्छुक नाहीत. परिणामी डाळिंब क्षेत्रात पुन्हा लवकर वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा