पुणे : बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नात असलेल्या गुजरातमधील तरुणाला समर्थ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाची पाेलिसांकडून चौकशी सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरव रामप्रताप सविता (वय २४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई लखन शेटे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, समर्थ पोलिसांचे पथकांकडून शुक्रवारी रात्री सराइतांची तपासणी (कोम्बिंग ऑपरेशन) करण्यात येत होती. वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सोमवार पेठ, रास्ता पेठेतील लाॅजची तपासणी करत होती. त्यावेळी एक जण रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिराजवळ थांबला असून, त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांचे पथक तेथे गेले. पोलिसांना पाहताच आरोपी गौरव तेथून पसार होण्याच्या तयारीत होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. समर्थ पोलीस ठाण्यात गौरवला नेण्यात आले.

त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार २०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी त्याला अटक केली असून, त्याने बनावट नोटा कोणाकडून आणल्या यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मेघराज जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Large stock of fake notes seized in central pune print news rbk 25 amy