पुणे : धनादेशन न वटल्याने झालेल्या वादातून एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अगरवाल याच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महात्मा गांधी रस्त्यावरीलब्रह्मा मल्टीकॉन कंपनीच्या कार्यालयात गुरुवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी ही घटना घडली. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मोटारचालकाला धमकावून त्याचे अपहरण केल्याप्रकरणी सुरेंद्र अगरवाल आणि त्याचा मुलगा विशाल यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या गुन्ह्यात सुरेंद्रला जामीन मंजूर करण्यात आला होता.

याबाबत विद्यासागर सेलवराज सिंगाराम (वय ३७, रा. वडगाव शेरी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लष्कर पोलिसांनी अगरवाल यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३५२, ३५१ (२), १२७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सिंगाराम हे एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीकडून देण्यात आलेला धनादेन न वटल्याने सुरेंद्रने त्यांना लष्कर भागातील कार्यालयात बोलावून घेतले. न वटलेला धनादेश घेऊन जा, असे सांगितले. सिंगाराम तेथे गेले. मात्र, मूळ धनादेश सापडत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. सिंगाराम यांनी त्यांच्या कंपनीच्या संचालकांना याबाबतची माहिती दिली. धनादेश सापडत नसेल तर अगरवाल याच्याकडून लेखी खुलास घे, असे सिंगाराम यांना संचालकांनी सांगितले. ‘जेव्हा धनादेश सापडेल, तेव्हा ते आम्हाला परत देतील आणि धनादेशाचा दुरुपयोग करणार नाही’,असे लिहून घेण्यास सांगितले.

हे ही वाचा…पुणे : वडापाव पाच लाखांना; ज्येष्ठाकडील दागिन्यांची पिशवी लंपास, हडपसर भागतील घटना

अगरवाल याने त्याच्या कामगारांना या पत्राची झेराॅक्स प्रत घेऊन ठेवण्यास सांगितले. त्यानंतर अगरवाल निघून गेले. मात्र, थोड्याच वेळाने कामगारांना दूरध्वनी करून मूळ कागदपत्र सिंगारामला देऊ नका, असे अगरवालने सांगितले. अगरवाल पुन्हा कार्यालयात आला आणि त्याने सिंगाराम यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. मूळ कागदपत्र (ओरिजनल सेटलमेंट ॲग्रीमेंट) फाडून टाकली, तसेच ‘तुला जीवे मारून टाकतो’, अशी धमकी दिल्याचे सिंगाराम यांनी फिर्यादीत म्हटले आहे. लष्कर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.