महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीची अखेरची बैठक शनिवारी (२६ मार्च) होत असली तरी ही बैठक घटनाबाह्य़ असल्याचा दावा परिषदेच्या एका पदाधिकाऱ्यानेच केला आहे. त्यामुळे केवळ विद्यमान कार्यकारिणीची बैठक होते की त्यानंतर नव्या-जुन्या कार्यकारिणीची एकत्रित बैठक होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. नुकत्याच झालेल्या परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल १५ मार्च रोजी लागला. त्यामुळे शनिवारची बैठक ही विद्यमान कार्यकारिणीची अखेरची बैठक मानली जात आहे. मात्र, निकाल लागण्यापूर्वीच्या तारखेचे म्हणजे १२ मार्चचे पत्र देत प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी या बैठकीचे पत्र हे १६ मार्च रोजी पाठविले असल्याचा दावा करीत कोशाध्यक्ष सुनील महाजन यांनी ही बैठकच घटनाबाह्य़ असल्याचा दावा केला आहे. घटनेनुसार कार्यकारिणीच्या सदस्यांना बैठकीचे पत्र १५ दिवस आधी पाठवावे लागते. यामध्ये घटनेचा भंग झाला असल्याचे पत्र महाजन यांनी कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांना पाठविले आहे. या पत्राचे शनिवारच्या बैठकीमध्ये वाचन करावे आणि या बैठकीविषयीच्या आक्षेपाची इतिवृत्तामध्ये नोंद करावी, अशी मागणी सुनील महाजन यांनी या पत्रामध्ये केली आहे.
परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी होत असून त्यामध्ये नैमित्तिक विषयांना मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीतील सदस्यांची ओळख करून घेणे हा एकत्रित कार्यकारिणीच्या बैठकीचा उद्देश असल्याचे पायगुडे यांनी सांगितले.
सदस्य संख्येमध्ये चारची भर
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीमध्ये २८ सदस्य आहेत. तर, नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीमध्ये चारजणांची भर पडली असून सदस्य संख्या आता ३३ झाली आहे. सातारा प्रतिनिधींमध्ये दोनजण तर सोलापूर आणि नाशिक येथील प्रत्येकी एक प्रतिनिधी वाढला आहे. माधव राजगुरू, वि. दा. िपगळे, बंडा जोशी, शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, सोपानराव चव्हाण, प्रा. नितीन ठाकरे, दशरथ पाटील, कल्याण शिंदे, प्रकाश देशपांडे, प्राचार्य तानसेन जगताप आणि सुरेश देशपांडे हे सदस्य प्रथमच निवडून आले आहेत. नूतन कार्याध्यक्ष प्रा. मििलद जोशी हे तीन वर्षांनंतर तर, रावसाहेब पवार हे तब्बल दशकानंतर पुन्हा परिषदेच्या कार्यकारिणीवर आले आहेत.

Story img Loader