महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात एका माऊलीचे आव्हान संपुष्टात आले. पण, शुक्रवारी दुसऱ्या माऊलीने अर्थात माऊली कोकाटेने सनसनाटी विजयाची नोंद करत गादी विभागातून आपली आगेकूच कायम राखली. तिसऱ्या फेरीत माऊलीने गतविजेत्या पृथ्वीराज पाटीलचे आव्हान संपुष्टात आणले. त्याचवेळी माती विभागातून बाला रफिकने आपला झंझावात कायम राखला.
हेही वाचा- महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेत ३१७ पदकांसह पुण्याला सर्वसाधारण विजेतेपद; ठाणे संघ उपविजेता
कोथरुड येथे सुरु असलेल्या ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत तिसऱ्या दिवशी माऊली कोकाटे आणि पृथ्वीराज पाटील ही लढत कमालीचे आकर्षण ठरली. पृथ्वीराजने गेल्याच महिन्यात राष्ट्रीय विजेतेपद मिळविले असल्याने त्याचे पारडे जड होते. त्याची सुरुवातही आक्रमक होती. मात्र, या नादात त्याचे नियंत्रण राहिले नाही. त्याच्या दोन्ही प्रयत्नांत कुस्ती धोकादायक स्थितीत गेली आणि याचा फायदा माऊलीला झाला. त्याने सुरुवातीलाच ४-अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही पृथ्वीराजने आक्रमक खेळण्याचाच प्रयत्न केला. मात्र, माऊलीने उंची आणि वजनाचा पुरेपूर फायदा ठेवत पृथ्वीराजला दूरच ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे गेल्या स्पर्धेत गादी विभागातील अंतिम लढतीत पृथ्वीराजने माऊलीवर मात करत किताबी लढतीत प्रवेश केला होता. माऊली गाठ आता शिवराज राक्षेशी पडणार आहे.
माती विभागातून माजी विजेत्या बाला रफिकने लढतीला सुरुवात होत नाही तोच साताऱ्याच्या किरण भगतला चितपट केले. केसरी गटातील आजची अखेरची लढत लावून पाहुणे जागेवरही जाऊन बसले नसतील, बालाने अवघ्या १४ सेकंदात दुहेरी पटाचा डाव टाकत किरणला चितपट केले. या लढतीत झटापटी दरम्यान किरणला दुखापत झाली. त्याचा खांदा जबर दुखावला.
हेही वाचा- लोणावळ्यातील वाहतूककोंडी सुटणार; आठ दिवसांत आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
माजी विजेता हर्षवर्धन सरगीर यानेही गादी विभागातून आपली आगेकूच कायम राखली आहे. हर्षवर्धनने तिसऱ्या फेरीत समीर शेखचे आव्हान अत्यंत सावध लढतीत ३-० असे संपुष्टात आणले. दरम्यान माती विभागातून माजी विजेता बाला रफिक शेख आणि साताऱ्याचा किरण भगत, लातूरचा शैलेश शेळके यांनी आपली आगेकूच कायम राखली. पुणे शहराच्या पृथ्वीराज मोहोळचे पदार्पण अपयशी ठरले असले, तरी त्याने तिसऱ्या फेरीत शैलेश शेळकेला दिलेली लढत तुल्यबळ ठरली. पृथ्वीराजने आपल्याबद्दलच्या अपेक्षा निश्चित उंचावल्या अशीच प्रतिक्रिया क्रीडानगरीत उमटत होती.