पुणे : उद्योग, कामगारनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ रुजावी, वाढावी यासाठी महापालिकेने पाच नाट्यगृहे उभारली आहेत. त्यांपैकी भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह एप्रिल महिन्यापर्यंत विविध कार्यक्रमांसाठी आरक्षित झाले आहे. मात्र, असे असतानाही महापालिकेने नाट्यगृहाकडे दुर्लक्ष केल्याने नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे श्रोत्यांना भौतिक सुविधेतील विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
या नाट्यगृहाला स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांसाठी शाळांची पसंती मिळते. त्याचप्रमाणे विविध कंपन्यांद्वारेही येथे संमेलन घेण्याची चढाओढ असते. त्यामुळे या नाट्यगृहात प्रायोगिक, हौशी आणि व्यावसायिक नाटके, लावणीचे कार्यक्रम कमी प्रमाणात होत असतानाही हे नाट्यगृह एप्रिल महिन्यापर्यंत आरक्षित आहे. वर्षभरात या नाट्यगृहाने महापालिकेच्या इतर नाट्यगृहांच्या तुलनेत विक्रमी उत्पन्न मिळविले. असे असतानाही महापालिकेचे या नाट्यगृहाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
आणखी वाचा-पिंपरी : मद्यपान करून वाहन चालवाल तर…; पोलिसांनी दिला गंभीर इशारा
नेमकी समस्या काय आहे?
कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या पडद्याची दुरवस्था झाली आहे. मंचावरील पडदे जुनाट झाले आहेत. भिंतीचा रंग उडाला आहे. काही ठिकाणी पापुद्रे आले आहेत. नाट्यगृहावरील मंचाच्या भिंतीला उंदीर, घुशी यांनी बिळे पाडली आहेत. कपाटांची मोडतोड झाली आहे. नळ दुरवस्थेत आहेत. महत्त्वाच्या व्यक्तीच्या खोलीजवळील मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा निघाला आहे. स्वच्छतागृहातील नळ निकामी आहेत. मुख्य प्रवेशद्वारावरील काचेचे दरवाजे नादुरुस्त झाले आहेत. स्वच्छतागृहातील आरसे निखळून पडले आहेत. नाट्यगृहातील खुर्च्यांची मोडतोड झाली आहे. त्यांचे कुशन बाहेर आले आहे.
टँकरने पाणीपुरवठा
काही दिवसांपासून नाट्यगृहातील जलवाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे पाण्याची साठवणक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे दररोज नाट्यगृहाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र, शाळेच्या स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम दिवसभर सुरू राहत असल्याने हे पाणी पुरत नाही. त्यामुळे स्वच्छतागृहातही पाणी राहत नसल्याने दुर्गंधीचा सामना श्रोते आणि विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. नाट्यगृहातील वातानुकूलन यंत्रणा थंड ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, नाट्यगृहातील पाण्याच्या कमतरतेमुळे वातानुकूलन यंत्रणेत बिघाड होऊन यंत्रणा बंद पडण्याच्या घटना होत आहेत.
या नाट्यगृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याचा सांस्कृतिक कार्यक्रमांवर परिणाम होत आहे. दुरवस्थेमुळे प्रायोगिक, हौशी आणि व्यावसायिक नाटके, लावणीचे कार्यक्रम कमी प्रमाणात होत आहेत. प्रशासनाने देखभाल-दुरुस्तीचे काम नियमितपणे करावे. नाटकांना पूरक अशी यंत्रणा निर्माण करावी. जेणेकरून नाट्यगृहाचा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयोग होईल, असे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष गौरी लोंढे यांनी म्हटले आहे.
प्रशासनाचे म्हणणे काय?
नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता आहे. खुर्च्या बदलण्यासह आवश्यक कामे तातडीने हाती घेतली जातील. नाट्यगृहाच्या रंगरंगोटीसह भौतिक सुविधेतील गैरसोयी दूर करण्यासाठी विलंब लागेल. ही कामे लवकर हाती घेण्याचा प्रयत्न आहे. नाट्यगृहासाठी नवीन नळजोड घेण्यात आला असल्याचे उपअभियंता शैलेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
(समन्वय : गणेश यादव)