चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाकडून अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. यामुळे त्याच भाजपाच्या अधिकृत उमेदवार आहेत का? अशी चर्चा सध्या पिंपरी-चिंचवड शहरात सुरू झाली आहे. एकीकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे देखील पोटनिवडणूकिसाठी इच्छुक आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी आज ग प्रभाग येथून उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. यामुळे भाजपाकडून त्या अधिकृत उमेदवार आहेत का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
हेही वाचा >>> कसबा पेठ पोटनिवडणूक: शिवसेना आग्रही असल्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू असताना आता अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे. भाजपाकडून आणखी कोणी उमेदवारी अर्ज घेणार का हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतु, राष्ट्रवादीकडून आज नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी अर्ज विकत घेतला असून काल बुधवारी राजेंद्र जगताप, माया बारणे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. राष्ट्रवादीकडून अनेक जण इच्छुक आहेत अशी स्थिती आहे. तर, भाजपाकडून सध्या तरी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला असल्याने शहरात त्याच अधिकृत उमेदवार असल्याची जोरदार चर्चा झाली आहे.