पुणे : रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला वेळेवर रुग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचविणाऱ्या लतिका परमार या युवतील ‘ब्रेव्हरी अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लतिका हिने तातडीने मदत करून प्राण वाचविल्याच्या घटनेची लाईफ सेव्हिंग फाउंडेशनने दखल घेतली. शिवाजीनगर मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या हस्ते लतिका हिचा गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक राजेश पुराणिक, पूना हॉस्पिटलचे विश्वस्त सतीश परमार आणि लाईफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक या वेळी उपस्थित होते. लतिका हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अधिकाधिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

स्वारगेट येथील चौकात रस्ता ओलांडत असताना कोल्हापूर येथील पाटील यांना ४ एप्रिल रोजी अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. ते विवाहाच्या घरगुती कामांसाठी कोल्हापूर येथून पुण्यात आले होते.  पडल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला, तसेच त्यांच्या दोन्ही गुडघ्यांना मार बसला होता.

नागरिकांनी त्यांना रस्त्याच्या कडेला आणले आणि चौकशी सुरू केली. मात्र, वेदनांमुळे पाटील काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

मैत्रिणीसमवेत रिक्षातून जात असलेल्या लतिका हिने रिक्षा थांबवली. तिने मोबाईलवरून वडील सतीश परमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना अपघाताची माहिती दिली. लतिकाने पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पाटील यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सायंकाळपर्यंत पाटील यांना बरे वाटू लागल्याने कुटुंबीयांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांना घरी सोडण्यात आले. पाटील यांच्या मुलीचा २४ एप्रिल रोजी विवाह झाला, अशी माहिती पाठक यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latika parmar get bravery award for saving life of accident victims