आता लावणी नव्हे ‘डीजे शो’ चालला आहे. लावण्याचे व्यवस्थित सादरीकरण होत नाही. पारंपरिक बाज ठेवला जात नाही. आता लावणीचे सादरीकरण करणारे शिकायला तयार नाहीत. लावणीची विटंबना होत असताना मनाला दुःख वाटत असल्याची खंत लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केली. लावणी कशी असते ही दाखविण्याची वेळ आली आहे. ज्याच्या त्याच्या हिशोबाने जे ते पोट भरत असल्याचे सांगत गौतमी पाटील यांच्यावर बोलताना अंगभर कपडे घालून लावणीचे सादरीकरण करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> खळबळजनक: प्रेमी युगलाला रिक्षात अश्लील चाळे करताना हटकले, प्रियकराने रिक्षा चालकाची केली हत्या
आमदार उमा खापरे, महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात २५ आणि २६ मार्च २०२३ रोजी महालावणी स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी आलेल्या पत्रकार परिषदेत सुरेखा पुणेकर बोलत होत्या.
वयाच्या आठव्या वर्षी मी या क्षेत्रात आले. शाळा मला माहिती नाही. लावणीसाठी मी योगदान दिले. लावणी लोक बघत नव्हते. महिला पुरुषांना लावणी पाहण्यासाठी पाठवत नव्हते. मी लावणी परदेशापर्यंत पोहोचवली. लावणी टिकली पाहिजे. महिलांनी बघितली पाहिजे. लावणीने मला घडविले. आता लावणीची विटंबना होत असताना मनाला दुःख वाटते. प्रत्येक ठिकाणी लावणीची विटंबना होत आहे. लावणीचे व्यवस्थित सादरीकरण होत नाही. लावणीचा पारंपरिकपणा जपला जात नाही.आता जे चालले आहे. त्याला लावणी न म्हणता डीजे शो चालला आहे. लावणीचा वेगळाच प्रकार आल्याची खंत सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केली. अंगभर कपडे घालून लावणीचे सादरीकरण करावे. खरी कला शिकावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केला.