गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील लाल महालामध्ये लावणीच्या रील्सचं चित्रीकरण झाल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडकडून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात वैशालीनं माफी मागितली असली, तरी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंदर्भात आपला निषेध म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघानं जिजाऊंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला. तसेच, ज्या ठिकाणी हे चित्रीकरण झालं, त्या भागात गोमूत्र शिंपडून त्याचं शुद्धीकरण केलं आहे.
नेमकं घडलं काय
पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महालामध्ये एका तमाशाच्या गाण्यावर चित्रीकरण झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी मिळून हे चित्रीकरण केल्याची माहिती देखील समोर आली आहे. या गाण्याच्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या आठवणींचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या लाल महालामध्ये अशा गाण्यांचं चित्रीकरण होणं हा लाल महालाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली आहे. यानंतर कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शुक्रवारी उघड झालेल्या या प्रकारानंतर आज अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालात जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्धभिषेक करण्यात आला. त्यानंतर ज्या ठिकाणी चित्रीकरण झाले, त्या ठिकाणाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण देखील करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणावरून वातावरण तापलं आहे. यासंदर्भात वैष्णवी पाटील हिनं माफी मागितल्याचा व्हिडीओ देखील जारी केला आहे.