राष्ट्रवादीशी संलग्न अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मावळ लोकसभेतील उमेदवारीला शेकापने पाठिंबा दिला, त्यासाठी शिवसेनेशी असलेली युती त्यांनी तोडली. त्यापाठोपाठ, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिल्याने जगतापांचे ‘बळ’ वाढले आहे. सुरुवातीपासून नाटय़मय घडामोडी होत असलेल्या मावळची लढत आता आणखीच रंगतदार झाली आहे.
आझम पानसरे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, जगतापांनी नाकारलेली सत्ताधाऱ्यांची उमेदवारी, त्यांना शेकापने दिलेला पाठिंबा, विद्यमान खासदार असूनही गजानन बाबर यांची कापलेली उमेदवारी, शिवसेनेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांना थेट राष्ट्रवादीची उमेदवारी व त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘दम’दार पाठिंबा अशा बहुचर्चित घटनांची साखळी मावळात सुरू आहे, त्यात बुधवारी आणखी भर पडली. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘कृष्णकुंज’वर झालेल्या बैठकीत जगतापांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी राज यांची भेट घेतली होती, त्यांच्यातील चर्चेत हा निर्णय झाला. गेल्या निवडणुकीत मावळात मनसेचा उमेदवार रिंगणात नव्हता, त्याचा थेट फायदा शिवसेनेला झाला होता. त्यामुळे यंदा मनसेची भूमिका काय, अशी उत्सुकता होती. खासदार गजानन बाबर यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. बाबरांनी मनसेची उमेदवारी स्वीकारावी, यादृष्टीने बरेच प्रयत्न झाले. तथापि, त्यांच्याकडून होकार मिळाला नाही. त्यानंतर, शेकाप व मनसे आघाडीनुसार मावळ मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शेकापच्या पाठिंब्यापाठोपाठ जगतापांच्या उमेदवारीला मनसेचे ‘बळ’ मिळाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा