पिंपरी महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे भाजपचे नेतृत्व देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरीत बोलताना केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय व राष्ट्रवादीचे ताकदीचे नेते म्हणून ओळखले जाणारे जगताप विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये आले आणि चिंचवड मतदारसंघातून निवडून आले. जगतापांची वैयक्तिक ताकद पाहता त्यांच्याकडे शहर भाजपाची सूत्रे देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरीत बोलताना याबाबतची अधिकृत घोषणा केली. शहरातील भाजपची ताकद वाढवण्यासाठी आणि महापालिकेवर पक्षाचा झेंडा लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जगतापांवर जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. पिंपरी पालिकेत भाजपचे संख्याबळ तीन आहे. ती संख्या वाढवून थेट पालिकेची सत्ता हस्तगत करण्याची शहर भाजपची व्यूहरचना आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक कामाला यापूर्वीच सुरूवात झाली आहे. या मोहिमेचे नेतृत्व जगतापांकडे राहणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman jagtap for lakshya