लोकसभा निवडणुकीत शेकापच्या तिकिटावर लढण्याचा प्रयत्न फसल्यानंतर माजी आमदार लक्ष्मण जगताप यांनी काही महिने शांततेत काढले. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्या ‘स्वगृही’ परतण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसते. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत ‘स्नेहभोजन’ घेतल्याची चर्चा ताजी असतानाच रविवारी अजितदादांच्या दौऱ्यात ते पुन्हा सहभागी झाल्याने याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
चिंचवड विधानसभेतून अपक्ष निवडून आल्यानंतर जगतापांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. मात्र, सरकारकडून मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीची लोकसभेची उमेदवारी नाकारली व मावळातील खालच्या तीन मतदारसंघाचे गणित मांडून ‘शेकाप’चा प्रयोग केला. मात्र, तो अंगाशी आला. लोकसभेच्या दारूण पराभवातून सावरल्यानंतर त्यांची पावले पुन्हा राष्ट्रवादीकडे वळू लागल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी अजितदादा आले असता चिंचवड मतदारसंघातील कार्यक्रमात जगताप त्यांच्यासमवेत होते. तथापि, ते राष्ट्रवादीत स्वगृही आले तरी अनेक मुद्दय़ांविषयी साशंकता आहे. चिंचवड मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडीविषयीची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे जगताप ‘अधिकृत’पणे पक्षात येतील का, चिंचवड राष्ट्रवादीचे ते उमेदवार होतील का, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजितदादा व पक्षाच्या नगरसेवकांना ते मान्य होईल का, याविषयी तर्क मांडले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा