महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्यानंतर पिंपरीतही नाटय़मय घडामोडींना सुरूवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय, माजी आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनपेक्षितपणे भाजपची वाट धरली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जगतापांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अजितदादांना पर्यायाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक व अजितदादादांचे शिलेदार म्हणून जगतापांकडे पाहिले जाते. राष्ट्रवादीची शहरात ताकद वाढण्यास तसेच पालिकेची सत्ता मिळवून देण्यात जगतापांचे योगदान महत्त्वाचे होते. गेल्या विधानसभेत अजितदादांची छुपी रसद मिळाल्याने ते चिंचवडमधून अपक्ष निवडून आले. अजितदादांच्याच सांगण्यावरून त्यांनी आघाडी सरकारला पािठबा दिला. मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी सरकारकडून घेतले, मात्र पाच वर्षांत ते प्रश्न सुटलेच नाहीत. िपपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही. शास्तीकराची जाचक आकारणी रद्द करण्याच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिले नाही, यामुळे जगताप सरकारवर नाराज होते. मात्र, तरीही त्यांनी अजितदादांशी साथ कायम ठेवली होती. मावळ लोकसभेची उमेदवारी जगतापांना देण्याचे पूर्ण नियोजन राष्ट्रवादीने केले. मात्र, त्यांनी ती नाकारली. बांधकामे व शास्तीकराचे निर्णय न होणे, हे कारण होते.
जगताप शेकापतर्फे लोकसभेची निवडणूक लढले. त्यात त्यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतरही, अजितदादांनी चिंचवड विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी ठरवली. महापौरांसह राष्ट्रवादीच्या २५ नगरसेवकांनी जगतापांसाठी पवारांना साकडे घातले. मात्र, मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्नच सुटले नाही म्हणून जगताप राष्ट्रवादीकडे जायला उत्सुक नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगत निर्णयाबाबत गूढ निर्माण केले. या दरम्यान भाजपचे बडे नेते जगतापांच्या संपर्कात होते. अखेर, घटस्थापनेच्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादीला अधिकृतपणे सोडचिठ्ठी देऊन खडसेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. जगतापांच्या भाजप प्रवेशामुळे चिंचवड विधानसभेचे तसेच िपपरी महापालिकेच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा