स्थानिक संस्था कराच्या (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) विरोधात व्यापारी संघटनांतर्फे तीव्र आंदोलन झाले असले, तरी व्यापाऱ्यांनी २० मे अखेर एलबीटीपोटी ३६ कोटी रुपये जमा केले आहेत. मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी अडीच हजार व्यापाऱ्यांनी एप्रिलचा एलबीटी महापालिकेकडे जमा केला.
स्थानिक संस्था कर प्रमुख, सहायक आयुक्त विलास कानडे यांनी सोमवारी ही माहिती दिली. प्रत्येक महिन्यात खरेदी केलेल्या मालावरील एलबीटी व्यापाऱ्यांनी पुढील महिन्यात दिनांक २० पर्यंत जमा करायचा आहे. त्यानुसार एप्रिल महिन्याचा एलबीटी जमा करण्याची मुदत सोमवारी संपली. शेवटच्या दिवशी एलबीटी जमा करण्याच्या प्रक्रियेला मोठा प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी २४ कोटी रुपये एकाच दिवशी जमा केले. अखेरच्या दिवशी अडीच हजार व्यापाऱ्यांनी एलबीटी जमा केल्याचे कानडे यांनी सांगितले.
शहरात व्यापार करणाऱ्या प्रत्येकाने एलबीटीसाठी नोंदणी करणे सक्तीचे असून आतापर्यंत ६३ हजार व्यापाऱ्यांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीसाठीची मुदत संपली असल्यामुळे तसेच गेल्या महिन्यातील एलबीटी भरण्यासाठीचीही मुदत संपल्यामुळे नोंदणी न केलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. मात्र, राज्य शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्यास कारवाई होणार नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एलबीटीसंबंधी महापालिका आयुक्तांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  सोमवारी बैठक घेतली. पुण्याचे आयुक्त महेश पाठक आणि िपपरीचे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी पुणे महापालिकेतून या बैठकीत भाग घेतला.