महापालिकेचा कोटय़वधी रुपयांचा स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) हजारो व्यापारी चुकवत असून एलबीटी रद्द होण्यापूर्वीच हा कर महापालिकेने वसूल केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शासनाच्या घोषणेप्रमाणे एलबीटी रद्द झाल्यास महापालिकेचे फार मोठे नुकसान होऊ शकते. त्यासाठी थकित एलबीटीची वसुली करावी अशी मागणी असल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसचे महापालिकेतील गटनेता आणि विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. राज्य शासनाने ऑगस्टमध्ये एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे दरमहा एलबीटी भरणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. शहरातील शेकडो व्यापारी असे आहेत की, ज्यांनी अद्याप एलबीटीसाठीची नोंदणीही केलेली नाही. महापालिकेने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे शिंदे म्हणाले.
जे व्यापारी पूर्वी जकात भरत होते त्या सर्वाची नोंद एलबीटीमध्ये झाली आहे का, याची तपासणी तातडीने करावी तसेच ज्यांची नोंद झालेली नाही आणि जे एलबीटी भरत नाहीत त्यांच्याकडून वसुली सुरू करावी, अशीही मागणी शिंदे यांनी केली. जकात भरणारे व्यापारी एलबीटी भरत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. एलबीटीची थकबाकी किती आहे तसेच कोणत्या व्यापाऱ्यांकडून एलबीटी भरला जात नाही याची मागणी केल्यानंतरही अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध झालेली नाही, असेही शिंदे म्हणाले. सद्य परिस्थितीत एलबीटी रद्द होण्यापूर्वीच एलबीटी वसूल झाला पाहिजे तसेच थकबाकीदार असलेल्यांच्या याद्या का दिल्या जात नाहीत याचाही खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा काही हजार रुपयातील कर थकला तर थकबाकी वसुलीसाठी ज्या पद्धती महापालिकेडून अवलंबल्या जातात, त्या पद्धती एलबीटी थकवणाऱ्यांसाठीही वापराव्यात, अशीही मागणी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा