स्थानिक संस्था कराच्या विरोधात व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत बंदमुळे पुणेकर हैराण झाले असून, त्यांच्याकडून व्यापाऱ्यांविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. याच्या जोडीनेच राजकीय पक्षांनी व संघटनांनी जोरदार विरोध केला असून सर्वसामान्यांना वेठीला धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
पुणे आणि पिंपरीत सोमवारपासून सुरू झालेल्या बेमुदत बंदमुळे नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. अनेक जीवनापयोगी वस्तू मिळानाशा झाल्या आहेत. दुकाने सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांना दमदाटी करून ती बंद पाडल्याचे प्रकारही पिंपरी व इतर भागात घडले आहेत. व्यापाऱ्यांचा बंद अनाठायी व करचुकवेगिरीच्या संरक्षणासाठीच असल्याच्या टीका नागरिकांबरोबरच राजकीय पक्षांनीही केली आहे.
बंद समाजविघातक- माकप
सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या मतलबी बडय़ा व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. पक्षाचे नेते अजित अभ्यंकर आणि पुणे जिल्हा समितीचे सचिव मिलिंद सहस्रबुद्धे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, करचुकवेगिरीच्या संरक्षणासाठीच एलबीटीला विरोध केला जात आहे. एलबीटीबाबत छोटय़ा व्यापाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे सुरू असलेला बंद हा पूर्णत: असमर्थनीय व अनाठायी आहे. केवळ कर बुडवण्यासाठी व स्वत:चे हिशेब लपवण्यासाठी केला जाणारा हा संप समाजविघातक आहे. त्यामुळे सरकारने या संपात हस्तक्षेप करावा.
जनतेला वस्तू पुरवा – आरपीआय
सर्वसामान्यांना वेठीला धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर जीवनावश्यक सेवा कायद्यानुसार कारवाई करा, अशी मागणी आरपीआयने केली असून तसे पत्रक पक्षाचे महापालिकेतील गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिले आहे. बंदमुळे गेले चार दिवस पुणेकरांचे तसेच अंगमेहनती व कष्टकरी समाजाचे, शहरी गरिबांचे हाल होत असून महापालिकेने जीवनावश्यक वस्तू एलबीटीमधून वगळल्या असतानाही त्या वस्तू बाजारात उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. या वस्तू अवाजवी दराने विकल्या जात आहेत. सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तातडीने सुरू करावा अन्यथा तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असाही इशाराही त्यांनी दिला आहे.
जनता धडा शिकवेल – काँग्रेस
एलबीटीच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतरही व्यापाऱ्यांनी जनतेला वेठीस धरले आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार अशा व्यापाऱ्यांवर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया पुणे शहर ज्येष्ठ नागरिक संघाने व्यक्त केली असून छोटी दुकाने बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना जनताच धडा शिकवेल, असे संघाने म्हटले आहे. जकात बंद करण्याच्या मागणीनंतर आता व्यापाऱ्यांनी एलबीटी बंद करण्याची मागणी केली आहे. म्हणजे व्यापाऱ्यांना कोणताच कायदा नको आहे. व्यापाऱ्यांनी आधी व्यापार सुरू करून मग चर्चा करावी, असेही संघाच्या पत्रकात म्हटले आहे. कृष्णकांत जाधव, उत्तम भूमकर, श्रीराम शिंदे, प्रा. तुकाराम पाटील यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
दुसरा मार्ग निवडा – परिषद
एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी बंद ऐवजी अन्य मार्गाने आंदोलन चालवावे, असे आवाहन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसनराव राठोड यांनी केले असून हे आंदोलन अधिक ताणल्यास सहानुभूतीची जागा जनतेचा संताप घेईल. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने व व्यवसाय सुरू करावेत, असे या परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
 
एलबीटीच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून व्यापारी संघटनांनी गुरुवारी नदीपात्राच्या रस्त्यावर मेणबत्ती मोर्चा काढला. त्याला मोठय़ा संख्येने व्यापारी उपस्थित होते. संघटनांच्या वतीने शुक्रवारी (५ एप्रिल) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.
 
बंदमुळे नागरिकांचे हाल, अनेक वस्तू गायब
शहरातील बेमुदत बंद गेले चार दिवस सुरू असून या बंदमुळे सर्वसामान्य पुणेकरांचे आता चांगलेच हाल होत आहेत. दूध तसेच साखर, धान्य आदी अनेक जीवनावश्यक वस्तू बाजारातून मिळवणे अवघड झाले आहे. विशेषत: परगावातून पुण्यात आलेले विद्यार्थी, ज्येष्ठ नागिरक, नोकरदार महिला, कष्टकरी यांचे हाल होत असून दुधासह अनेक वस्तू गायब झाल्या आहेत. बंदमध्ये छोटी-मोठी किराणा दुकानेही सहभागी झाल्यामुळे दुधाच्या पिशव्या मिळणे कठीण झाले असून दुधाअभावी पुणेकरांचे हाल सुरू झाले आहेत. गणेश पेठेतील दूध भट्टीवरील भावही कडाडले आहेत. तेथे ५० ते ६० रुपये प्रतिलिटर या दराने दुधाची विक्री गुरुवारी होत होती.
 किरकोळ दुकानदार दोन-तीन दिवस पुरेल एवढाच साठा दुकानात ठेवतात आणि साठा संपत आला की, घाऊक भुसार बाजारातून लागेल तसा माल खरेदी करतात. मात्र, गुलटेकडी मार्केटयार्ड येथील घाऊक भुसार बाजार कडकडीत बंद असल्यामुळे शहरातील जी काही दुकाने उघडी आहेत त्यांच्याकडेही माल शिल्लक नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे साखर, धान्य, डाळी, गहू, तांदूळ वगैरेंची चांगलीच टंचाई किरकोळ बाजारात जाणवत आहे. जनावरांसाठी लागणारी पेंड, सरकी पेंड, भुस्सा यांचीही खरेदी एक-दोन दिवस पुरेल एवढीच केली जाते. मात्र, पेंड वगैरेचाही घाऊक बाजार बेमुदत बंद राहिल्यामुळे पशुखाद्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. छोटय़ा-मोठय़ा हॉटेलचालकांपुढे तसेच खानावळी चालवणाऱ्यांपुढेही बंदमुळे गंभीर समस्या उभी राहिली आहे. हे व्यावसायिक सामान्यत: तीन-चार दिवसांचाच किराणा भरून ठेवतात. मात्र, आता शहरात फक्त भाजीपालाच उपलब्ध होत आहे. धान्य आदींचा साठा गायब झाला आहे. तसेच जेथे या वस्तूंची विक्री सुरू आहे त्यांनी वारेमाप भाववाढ केली आहे.