पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येण्यास सुरुवात झाली असतानाच राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या अनेक शिलेदारांनी मंगळवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील ‘मोदीबाग’ या निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, भाजप नेते पृथ्वीराज जाचक यांच्यासह शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे अजित पवार यांच्या कोणत्या शिलेदारांना पक्षात घेऊन शरद पवार त्यांना धक्का देणार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणूक निकालात वरचष्मा राहिल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील अनेक नेत्यांची चढाओढ सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामध्ये कोल्हापूर ग्रामीणचे भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे, इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय अजित पवार यांचे समर्थक रामराजे निंबाळकर हे ही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेकजण शरद पवार यांच्या भेटीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
हेही वाचा – पुणे : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र पाटील पक्षात रहावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ते शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश करणार असून ते मोहोळ मतदारसंघातील उमेदवार असतील, अशी चर्चा होती. मात्र पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीसंदर्भात पवार यांची भेट घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.
जुन्नरचे आमदार अतुल बेनकेही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून आहे. पवार यांच्या जुन्नर दौऱ्यावेळी बेनके यांनी पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर मोदीबागेत त्यांची पुन्हा भेट झाल्याने ते लवकरच पक्ष प्रवेश करतील, या चर्चेने जोर धरला आहे.
शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर रविकांत तुपकर यांनी महाविकास आघाडीमध्ये जावे, असे त्यांच्या सहकाऱ्यांचा आग्रह होता. त्यानुसार तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे (ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या पवार भेटीमुळे ते महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षात जाणार, याची चर्चा सुरू झाली. राज्यातील चोवीस जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा तसेच खानदेशातील काही जागांचा समावेश आहे. महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारे सामावून घेतले जाऊ शकते, यासंदर्भात ही भेट होती, असे तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.