पुणे / इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा पराभव झालेल्या हर्षवर्धन पाटील यांना कोणत्या निकषावर उमेदवारी जाहीर केली, अशी विचारणा करत पाटील यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास इंदापूरमध्ये राज्यातील सर्वांत मोठी बंडखोरी होईल आणि ती पक्षाला परवडणार नाही, असा इशारा इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील नाराजांनी शुक्रवारी दिला. पाटील यांना उमेदवारी दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यात येईल, असेही या वेळी जाहीर करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांची इंदापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे पक्षातील सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती दशरथ माने, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे आणि इंदापूरचे उपनगराध्यक्ष भरत शहा नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या नाराज गटाचा ‘परिवर्तन’ मेळावा शुक्रवारी इंदापूर येथे झाला. त्या वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आला.

हेही वाचा – बोपदेव घाटप्रकरणातील आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी मद्य प्राशन केल्याचे उघड, तीन आरोपी मध्य प्रदेशातील; एकाला अटक

इंदापूरमधील कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पक्षातील फुटीनंतर शरद पवार यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतला. इंदापूर तालुक्यावर सन १९५२ पासून घराणेशाही लादली गेली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी १९९५ मध्ये बंडखोरी केली. त्यानंतर ते युती सरकारमध्ये सहभागी झाले. ते पुढे काँग्रेसचेही मंत्री झाले. नंतर ते भाजपमध्ये गेले. आता तर ते पक्षात येऊन तंबूच घेऊन चालले आहेत. त्यातच इंदापूरमधून सलग दोन वेळा पराभूत झालेल्या पाटील यांना कोणत्या निकषावर उमेदवारी जाहीर केली, अशी विचारणा या नाराज गटाने केली.

हेही वाचा – ‘एसएमएस’ पाठवण्यासाठी २४ कोटींचा खर्च; राज्य सरकारचा निर्णय वादात

पाटील यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा. इंदापूर मतदारसंघातील नागरिकांच्या भावना लक्षात घ्याव्यात. दोन हजार कार्यकर्त्यांना घेऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, आयात उमेदवार नको, अशी मागणीही त्यांच्याकडे करण्यात आली होती. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुक्यावर प्रेम असेल, तर त्यांना निर्णय बदलावा लागेल. अन्यथा इंदापूरमधील बंडखोरी परवडणार नाही आणि ती राज्यातील सर्वांत मोठी बंडखोरी असेल, असा इशाराही देण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leaders of sharad pawar group in indapur are determined to contest elections demand reconsideration of candidature given to harshvardhan patil pune print news apk 13 ssb