सागर कासार | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस होत आले आहेत. मात्र अजूनही सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यभरातील शेतकर्‍यांसमोर अवकाळी पावसामुळे मोठ संकट निर्माण झालं आहे. त्यावर राज्यकर्त्यांकडून एकत्र येत कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा ठोस उपाय योजना होताना दिसत नाही. केवळ आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, याकडे सध्या सर्व नेत्यांचं लक्ष आहे, मात्र शेतकर्‍यांकडे पाहण्यास वेळ नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पुरंदर तालुक्यातील शेतकरी पांडुरंग झेंडे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात अवकाळी पावसामुळे 325 तालुक्यातील 54 लाख 22 हजार हेक्टर जमीन बाधित झाली आहे. यामुळे ज्वारी, बाजरी, गहू, मका, धान, तूर, सोयाबीन आणि फळबाग यांना सर्वाधिक फटका बसला आहे. परिणामी राज्यातील शेतकर्‍यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच, परिस्थिती पुणे जिल्ह्याची देखील असून 21 हजार 681 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्हय़ातील पुरंदर तालुक्यातील दिवा गाव येथील साधारण 3000 हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या काळेवाडी गावातील शेतकरी सीताफळ, डाळिंब, अंजीराची सर्वाधिक लागवड करतात. मात्र चार महिन्यापासून सततच्या आणि अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले त्यांचे पीक वाया गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

या पार्श्‍वभूमीवर यावेळी पांडुरंग झेंडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, एक एकर शेतामध्ये डाळिंबाची 400 झाडी होती. तर अवकाळी पावसामुळे हाताला आलेल पीक वाया गेले असून तब्बल पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच आम्ही पुन्हा नव्याने उभे राहण्याचे दृष्टीने सरकारने आम्हाला लवकरात लवकर मदत करावी.

सरकारने लवकर मदत न दिल्यास, आम्ही किमान १५ वर्ष मागे जाऊ : देवराम काळे
माझी पाच एकर सीताफळाची बाग आहे. या बागेत साधारण पाच वर्षाची झाडे आहेत. मात्र या अवकाळी पावसामुळे सर्व झाडांचे पूर्णपणे नुकसान झाले असून, यामुळे किमान आठ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. माझ्या सारखेच इतर शेतकऱ्याचे देखील नुकसान झाले आहे. मात्र, यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना किंवा पंचनामे देखील करण्यात आलेले नाहीत. आम्हाला लवकरात लवकर मदत करावी, अन्यथा आम्ही किमान १५ वर्ष मागे जाण्याची शक्यता आहे.