पुणे : कृत्रिम प्रज्ञेमुळे (एआय) जगात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहे. यामुळे रोजगारावर गंडांतर येईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. याचबरोबर भविष्यातील चित्र पूर्णपणे पालटलेले दिसेल, अशीही चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात कृत्रिम प्रज्ञेबद्दलचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे मोठे बदल होणार असले, तरी ते नेमके कशा प्रकारचे असतील हे आताच सांगता येणार नाही, असे मत आघाडीच्या उद्योजकांनी शनिवारी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील यशदा सभागृहात ‘हीरोची यशोगाथा’ या उद्योजक सुनील कांत मुंजाल लिखित, मीना शेटे-संभू अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी सुनील कांत मुंजाल, उद्योजक संजीव बजाज, डॉ. अभय फिरोदिया, नमिता थापर, मंजुल पब्लिशिंग हाउसचे प्रकाशक विकास रखेजा, मुख्य संपादक चेतन कोळी आदी उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे: कोंढव्यात ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांचे बाॅम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर

पुस्तक प्रकाशनानंतर ‘काळानुसार बदलणारी उद्योजकता’ या विषयावर चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात कृत्रिम प्रज्ञा या विषयावर उद्योजकांनी मते मांडली. कृत्रिम प्रज्ञेमुळे भविष्यात काय घडेल, याबाबतचे चित्र अस्पष्ट असून, आताच त्याबद्दल सांगणे शक्य होणार नाही, असे मत डॉ. फिरोदिया यांनी व्यक्त केले.

बजाज यांनी कृत्रिम प्रज्ञेमुळे रोजगारावर सध्या होत असलेल्या परिणांमाबाबत भाष्य केले. ते म्हणाले, की कृत्रिम प्रज्ञेमुळे साधे आणि एकाच साच्याचे रोजगार कमी होतील. मात्र, त्यामुळे नवनवीन संधी निर्माण होतील. कृत्रिम प्रज्ञेमुळे उलथापालथ होणार असली, तरी भविष्यातील चित्र आताच कोणी सांगू शकत नाही.

हीरो ग्रुपने जपलेल्या व्यावसायिक बांधिलकीमुळे आज कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये आमच्याविषयी विश्वासार्हता निर्माण झाली आहे, असे पुस्तकाचे लेखक सुनील कांत मुंजाल म्हणाले.

हेही वाचा – Panvel-Nanded Express : पुण्यात चक्क झुरळांमुळे काही तास रखडली रेल्वे, पाहा Video

पाकिस्तानातून आलेल्या ब्रिजमोहनलाल मुंजाल यांनी अत्यंत प्रतिकूल वातावरण असतानाही आत्मविश्वास, जिद्द आणि धडाडीच्या जोरावर आपले साम्राज्य उभारले, असे मत डॉ. फिरोदिया यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता काळे यांनी केले, तर चर्चासत्राचे सूत्रसंचालन परीक्षित लुथ्रा यांनी केले.

महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याची गरज

नमिता थापर यांच्यासह सर्व उद्योजकांनी महिलांचे प्रतिनिधित्व उद्योगांमध्ये वाढविण्याचे मत व्यक्त केले. सातत्य, चिकाटी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती हीच यशस्वी उद्योजकतेची मूलभूत तत्त्वे असल्याचे मत थापर यांनी व्यक्त केले. महिला उद्योजकांची संख्या समाजात कमी असून, महिलांना उद्योजकतेसाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leading entrepreneurs in pune comment on ai pune print news stj 05 ssb
Show comments